नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

prahar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची धक्कादायक बाब प्रहार संघटनेने उजेडात आणली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही रक्कम आकारणी पद्धती तातडीने बंद करण्याची मागणी प्रहार युवा आघाडीने केली असून, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी हायड्रोलिक ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये मोकळ्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणतात. अशावेळी हिशेब पट्टीतून ‘वाराई’ ‘हमाली’ आणि ‘तोलाई’पोटी काही ठरावीक रक्कम कापली जाते. परंतु हायड्रोलिक ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये कांदा विक्रीस आलेला असल्यास हमालांचे काहीच काम पडत नाही. अशावेळी लिलावाच्या ठिकाणी मालक असलेला शेतकरी हमाल बांधवांची मदत न घेता सर्व काही कामे स्वतः करून घेत असल्याने ‘काम नाही, तर दाम नाही’ या नियमानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून ‘हमाली’ची रक्कम आकारणी बंद करावी, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यातील काही बाजार समित्यांच्या मालकीचे वजनकाटे बंद अवस्थेत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लिलावानंतर स्वखर्चाने खासगी वजनकाट्यावर वजन करावे लागते. तरीदेखील शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून ‘तोलाई’ची रक्कम कापली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्याला बाहेर खासगी वजनकाट्यावरही पैसे खर्च करावे लागतात. लिलावाच्या वेळी ट्रॅक्टरच्या फाळक्यातून खाली पडलेला कांदा भराईसाठी एकतर वेगळे पैसे द्यावे लागतात किंवा स्वतःला कांदे भरून घ्यावे लागतात. ज्या बाजार समितीकडून शेतकऱ्यांचे कांदा ट्रॅक्टर अथवा इतर वाहनांचे वजन केले जात नाही, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून ‘तोलाई’ची रक्कम आकारणी त्वरित बंद करावी. तसेच करोडो रुपये उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांनी बंद वजनकाटे तत्काळ सुरू करावेत. या सर्व मागण्यांची त्वरित दखल घेऊन जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून ‘वाराई’,’हमाली’ व ‘तोलाई’ची रक्कम आकारणी बंद करावी, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, प्रहार युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, युवा तालुकाध्यक्ष जयेश जगताप, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सनी गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट appeared first on पुढारी.