नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ

अतिक्रमण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरभर कारवाई केली जात असून, शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड व परिसरात दिवसाआड कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, अशातही बाजारपेठेतील अतिक्रमण ‘जैसे थे’ असून, विक्रेते आणि मनपा कर्मचार्‍यांमध्ये जणू काही पाठशिवणीचा खेळ सुरू आहे.

शालिमार, मेन रोड, सराफ बाजार, दहीपूल या भागात विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात असल्याने, वाहतुकीसह रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो. काही विक्रेत्यांनी बेकायदा या भागात ओटे बांधले आहेत. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने या भागात प्रभावीपणे मोहीम राबवून हे बांधलेले ओटे तोडावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली होती. त्याचबरोबर सराफ असोसिएशनने देखील तत्कालिन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून याबाबतची कैफियत मांडली होती. त्यानंतर दिवसाआड याभागात मोहीम राबविली जावी याबाबत मनपा आयुक्तांनी आदेश दिले होते. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या भागात कारवाई केली जात आहे, परंतु पथकाची पाठ फिरताच अतिक्रमण ‘जैसे थे’ होत असल्याने, हा भाग अतिक्रमण मुक्त कसा होणार असा पेच निर्माण झाला आहे.

ठोस कारवाई केव्हा?
अतिक्रमण निर्मूलनचे पथक येत असल्याची बाब विक्रेत्यांना अगोदरच समजत असल्याने, पथकाच्या हाती काहीच लागत नसल्याचे गेल्या काही दिवसांच्या कारवाईवरून समोर येत आहे. दरम्यान, विक्रेते-मनपा कर्मचार्‍यांच्या या पाठशिवणीच्या खेळाचा काहीच उपयोग होत नसल्याने शहराची बाजारपेठ केव्हा मुक्त श्वास घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर पथकाने ठोस कारवाईसाठी व्यूहरचना आखावी, अशी मागणीही परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विक्रेते अन् मनपा प्रशासनात पाठशिवणीचा रोजचाच अतिक्रमणाचा खेळ appeared first on पुढारी.