नाशिक विमानतळाला ‘जटायू’ नाव द्या, ‘या’ महंताने केली मागणी

Nashik Airport,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ओझर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महर्षी पंचायतम सिद्धपीठचे महंत अनिकेतशास्त्री यांनी विमानतळाला ‘जटायू’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. तसेच रामायणात जटायूचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू’ नाव द्यावे, असे मत महंत अनिकेतशास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, अशी मागणीदेखील बऱ्याच वर्षांपासून केली जात आहे. अशात आता रामायणातील जटायूचे नाव हे नाशिकच्या ओझर विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्याने विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, महंत अनिकेतशास्त्री यांनी म्हटले आहे की, ‘केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उड्डाणमंत्री यांना नम्रपणे प्रतिपादन करू इच्छितो की, नाशिक विमानतळाला ‘जटायू एअरपोर्ट’ या नावाने संबोधले जावे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकनगरी ही कुंभनगरी आहे आणि जटायू यांचे रामायणात अमूल्य असे योगदान आहे. त्यामुळे हे एअरपोर्ट जटायू या नावाने संबोधले जावे, असे सर्व संत समाजाच्या वतीने, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आणि नाशिकनगरवासीयांच्या वतीने विनंती करू इच्छितो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

The post नाशिक विमानतळाला 'जटायू' नाव द्या, 'या' महंताने केली मागणी appeared first on पुढारी.