नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांना सहा महिने कारावास

साधा कारावास,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पती, सासू, सासरा व दिरास न्यायालयाने सहा महिने कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विवाहितेचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील राहुल अशोक यादवसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत पती राहुल याच्यासह सासरे अशोक दामोदर यादव, सासू आशा यादव व दीर विपुल यादव व आणखीन एका महिलेने छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दिली होती. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत, पैसे न आणल्याने आरोपींनी छळ करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले होते.

त्यानुसार उपनगरचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ए. ए. येवला यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. पी. घोडेस्वार यांनी युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायाधीश शर्वरी एम. जोशी यांनी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे चौघांना विवाहितेचा छळ व मारहाण प्रकरणी सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार गौरव साळवे यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांना सहा महिने कारावास appeared first on पुढारी.