नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, नवीन नाशिक येथील युवा कार्यकर्ते सुमित सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी पटोले यांनी आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरता नाशिक जिल्ह्यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाईल व पक्ष प्रवेश करणाऱ्यांना पक्ष संघटनेत लवकरच नवीन जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी शहर काँग्रेसच्या कार्याचा अहवाल सादर केला. तसेच आगामी काळामध्ये नाशिक शहरातील अनेक विविध पक्षातील बडे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच जिल्हा प्रभारी राजू वाघमारे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, नाशिक जिल्हा एन.एस.यु आयचे अध्यक्ष अल्तमश शेख, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष गौरव सोनार, अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्पेश जेजुरकर, कुलदीप (गुड्डू) गवई, सुमित सोनवणे, विवेक कडवे, दिलीप सिंग, अण्णासाहेब कटारे, राहुल जानराव, अनिल शिंदे, संदीप भालेराव, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.