बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीएसआर) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून, बड्या चेहऱ्यांना गळाला लावण्यासाठी इच्छुकांवर डोळा ठेवण्याची रणनीती पक्षाकडून राबविली जात आहे. बीएसआर पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली असून, आता त्या-त्या जिल्ह्यात पक्षाचा चेहरा शोधण्याचे काम केले जात आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने उतरण्याची यापूर्वीच मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घोषणा केली आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून जाेरदार तयारीही केली जात आहे. हिंदी आणि मराठीतून तेलंगणाच्या विकासाच्या जाहिराती तसेच मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातदेखील अशा प्रकारची फलकबाजी केल्याने लोकसभेसह विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बीएसआर उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशात उमेदवारांचा शोध घेतला जात असून, इच्छुकांवर पक्षाचा डोळा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जवळपास सर्वच पक्षांकडून इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यातही भाजप आणि राष्ट्रवादी या बड्या पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बीएसआरने या दोन पक्षांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर येत आहे. कारण तिकीट नाकारल्यास अनेक जण दुखावत असल्याने अन्य पर्याय किंवा अपक्ष लढविण्याची तयारी दर्शवितात. अशात अपक्षापेक्षा बीएसआरसारख्या पक्षाचा पर्याय उत्तम, असा विचार इच्छुकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बीएसआरकडून अशा इच्छुकांना गळाला लावण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये बीएसआरकडून जोरदार फलकबाजी केली जात असून, नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाकडे एकही प्रबळ चेहरा नसला तरी, पक्षाकडून जोरदार चाचपणी सुरू आहे. विशेषत: माजी आमदार, खासदारांना गळाला लावण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

बसपाला पर्याय

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या अनेक इच्छुकांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. आता बसपाला बीएसआरचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने इतर पक्षातील इच्छुकांना तिकीट नाकारल्यास बीएसआरच्या तिकिटावर लढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बीएसआरने ‘अब की बार, किसान की सरकार’ असा नारा दिल्याने, ग्रामीण भागात विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

The post बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा appeared first on पुढारी.