Nashik : परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची मुजोरी, ग्राहकास बेदम मारहाण

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महात्मा गांधी रोडवरील परप्रांतीय मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी घडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली. या घटनेने मोबाइल विक्रेत्यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांच्यावर पोलिस कारवाईची मागणी ग्राहकांनी केली आहे. या प्रकरणी विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी फक्त तक्रार लिहून घेतली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी रोडवर मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एका ग्राहकास मोबाइल विक्रेत्यांच्या गटाने बेदम मारहाण केली. मोबाइल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमुळे या परिसरात ग्राहकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, विक्रेत्यांकडून अरेरावी वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. याआधी ऑगस्ट २०२२ मध्येही मोबाइलचे कव्हर खरेदी केले नाही म्हणून एका ग्राहकास पाठलाग करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे नामांकित कंपन्यांच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री केल्याप्रकरणीही विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

मंगळवारी काही विक्रेत्यांनी एका ग्राहकास भररस्त्यात बेदम मारहाण केली. यावेळी वाहतूक काेंडी झाली होती. विक्रेत्यांनी जमाव गोळा करून ग्राहकास मारहाण केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. त्यानंतर ग्राहकाने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासत दोघांना ताब्यात घेतले. मात्र, कोणाविरोधातही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

परप्रांतीयांच्या मुजोरीत वाढ

विक्रेत्यांकडून होणाऱ्या अरेरावीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार येथील परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी वाढली असून, ग्राहकांवर अरेरावी व मारहाणीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. यासंदर्भात सरकारवाडा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार नसल्याने संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांची मुजोरी वाढल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची मुजोरी, ग्राहकास बेदम मारहाण appeared first on पुढारी.