नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजकारणामध्ये मनभेद व मतभेद होऊ शकतात. ते दूरही होऊ शकतील. पण, राजकारणातील विश्वासघात भाजप कदापही सहन करू शकत नाही. अशा प्रवृत्तींना भाजपमध्ये स्थानही नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असे सांगताना अयोध्येत तुम्हीही जा, आम्हीपण जाऊ, असा सल्लादेखील बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शनिवारी (दि.8) नाशिक दौर्‍यावेळी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. हाच धागा पकडून बावनकुळे यांनी ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. राजकारणातील विश्वासघाताला भाजपमध्ये स्थान नसल्याचा इशारा बावनकुळे यांनी ठाकरे यांना दिला. ते म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचे 500 वर्षांपूर्वीचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे या गोष्टीचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या किंचित सेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍याला विरोध करण्याचे कारण नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरून केलेल्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्या आरोपांवर आमच्या पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, ते जेव्हा निवडून आले तेव्हा ईव्हीएम खराब नसते. केवळ आम्ही निवडून आलो की, ईव्हीएम खराब होते. तसेच त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची व त्यांच्या बाजूने निकाल आल्यास लोकशाही जिवंत असते. आमच्या बाजूने निकाल लागल्यास लगेचच टीका केली जाते, अशा शब्दांत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. खा. पवार खरंच बोलले! हिंडेनबर्ग प्रकरणावरील जेपीसीच्या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे खरंच आहे. हिंडेनबर्गसारख्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत खा. पवार यांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्र म्हणून योग्य आहे. या प्रकरणात काँग्रेसने आरोप करायचे म्हणून केले, अशीही टीका बावनकुळे यांनी केली.

2024 पर्यंत हादरे बसतील!
2024 पर्यंत भाजपत पक्षप्रवेश सोहळे पार पडणार आहेत. विरोधकांना आम्ही मोठे हादरे देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. तसेच मनसेशी युती करण्यासंदर्भात त्यांना विचारले असता राज्यस्तरावर मनसे पक्ष आमचा चांगला मित्र आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही नाशिककरांच्या पाठीशी
चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या जागेवर उद्योग वसविण्याच्या मुद्दयावरून भाजपतील आमदारांमध्ये जुंपली असल्याचे बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर या प्रश्नी आमदारांचा काही एक संबंध नसून नाशिककर घेतील, तो निर्णय मान्य असेल. नाशिककरांच्या पाठीशी आम्ही आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.