नाशिक : वेतन थांबविण्याच्या निर्णयावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा यू टर्न

शिक्षक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापकांना तिसरे अपत्य असल्याने त्यांच्यावर वेतन थांबविण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, आठच दिवसांत त्यांनी या कारवाईला स्थगिती देत असल्याचा आदेश काढत यू टर्न घेतल्याने सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे.

सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस यांना लहान कुटुंब कायदा 2005 ची अंमलबजावणी झाल्यानंतर शिक्षणसेवक म्हणून मान्यता मिळाली आहे. मुख्याध्यापक फरस यांनी लहान कुटुंब कायदा शासन नियमाचा भंग करीत तिसरे अपत्य जन्माला घातल्याने नियमानुसार त्यांना बडतर्फ करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते द्यानद्यान यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक व वरिष्ठ कार्यालयास तक्रार केली होती. या गंभीर प्रकाराबाबत वेळोवेळी स्मरणपत्राद्वारे लक्षही वेधले. तरीही कोणी दाद देत नसल्याने द्यानद्यान यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात चुप बैठो आंदोलन केले होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी वेतन थांबविण्याची कारवाई केली होती. मात्र, आता त्यांनी त्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात शिक्षणाधिकारी कारवाई का करत नाही किंवा या प्रकारात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का? अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात झडत आहे.

उपसंचालकांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संस्थेला पत्र लिहून संबंधित मुख्याध्यापकाला बडतर्फ करण्याची सूचना केली होती. संस्थेने यात काहीही हालचाल केली नाही त्यामुळे आता त्यांची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्या वेतन कपातीच्या पत्राला तूर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. – प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक.

म्हूणून बडतर्फीची कारवाई केली नाही..
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे संस्थाचालक अध्यक्ष शांताराम लाठर यांचे जावई (मुलीचे पती) असल्याने आपसातील हितसंबंध जपत बडतर्फीची कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. तसेच यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यतादेखील बोलली जात आहे.

शिक्षण अधिकारी यांच्या या संशयास्पद गंभीर बाबीची चौकशी करावी. दोषी मुख्याध्यापक यांचे बेकायदेशीर देत असलेले वेतन तत्काळ थांबवून मान्यता रद्द करण्यात यावी. अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत. याबाबत शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव यांना मेलद्वारे कळविले आहे. –  विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

The post नाशिक : वेतन थांबविण्याच्या निर्णयावरून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा यू टर्न appeared first on पुढारी.