नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी गुरुवारी (दि.15) अखेरची संधी मिळणार आहे. 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत विलंब, तर 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरतात. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील 38 हजार 477 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 35 हजार 848 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीत येणार्‍या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती मिळते. दरम्यान, शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती https:/www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.

फेब्रुवारीत परीक्षा
यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत घेण्याचे राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केले आहे. त्यानुसार 12 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सकाळी 11 ते 12.30 व दुपारी 2 ते 3.30 अशा दोन सत्रांत पेपर घेण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शिष्यवृत्ती अर्जासाठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.