नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट किंवा 18 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा एजंट गजाआड केले आहेत. पोलिस तपासात गुंतवणूकदारांची अंदाजे 35 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. मात्र पोलिसांकडे आतापर्यंत अवघ्या 52 गुंतवणूकदारांनीच तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीनुसार सुमारे अडीच कोटींची फसवणूक उघडकीस आली आहे.

दरम्यान या सहा संशयितांनी गुंतवणूकदारांकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने कोट्यवधी रुपये घेतल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. नंदकुमार निवृत्ती वाघचौरे (38), भाऊसाहेब बाबूलाल पाटील (35), प्रशांत रामदास पाटणकर (34), वैभव विजय ननावरे (26), साईनाथ केशव त्रिपाठी (24) आणि ज्ञानेश्वर रामकृष्ण वाघ (41) या संशयितांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या आठ झाली आहे. यापूर्वी कंपनी संचालक अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव) आणि अमोल कैलास शेजवळ (रा. शिर्डी) यांना अटक केली होती. हे दोन्ही संशयित नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयितांनी संगनमत करून दोन कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांमार्फत संशयितांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मात्र ठरल्याप्रमाणे संशयितांनी कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे महिलेसह 11 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली आहे. त्यातील सहा एजंटनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बँक खात्यात 65 लाख ते तीन कोटी 76 लाख रुपयांपर्यंत पैसे आढळून आले आहेत. त्यामुळे दोन्ही संचालकांच्या बँकेतील रकमेपेक्षा जास्त पैसे एजंटच्या बँक खात्यात आढळल्याचे समोर येत असून, पोलिस त्यांच्या बँक व्यवहारांचा तपास करीत आहेत. त्याचप्रमाणे संशयितांनी गुंतवणूकदारांकडून रोख स्वरूपातही पैसे घेतल्याचे आढळले आहे. हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत असून, संशयितांविरोधात भद्रकाली व मुंबई नाका पोलिसांत फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या संशयितांचे शिक्षण अवघे सातवी ते पदवीपर्यंत झाले असून, त्यापैकी सातवी शिकलेल्या एजंटच्या बँक खात्यात सर्वाधिक तीन कोटी 76 लाख रुपये आढळले आहेत. सहाही संशयित एजंट पूर्वीपासून एजंटचेच काम करत असल्याचे समोर येत आहे.

कंपनी संचालक व एजंटच्या बँक व्यवहारांसह इतर आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. तक्रारदारांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. – अशोक शरमाळे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

हेही वाचा:

The post नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा appeared first on पुढारी.