नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण

शेती मशागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या कृषी विभागांतर्गत 2014-15 पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2022-23 वर्षाकरिता या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

या योेजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 501 लाभार्थ्यांना 1 कोटी 17 लाख 62 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हमखास सिंचनाखाली न येणाऱ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून, नवीन उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे आहे. त्यासाठी गाव पातळीवर बैठक घेऊन उपविभागात 2 प्रकल्प गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सटाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, इगतपुरी, पेठ, सुरगाणा व देवळा या तालुक्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत 2022-23 वर्षाकरिता अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी 14 लाख 24 हजार, अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी 21 लाख 36 हजार व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 66 लाख 80 हजार रुपये अशा एकूण 1 कोटी 2 लाख 40 हजार रुपये निधीची तरतुद करण्यात आली. यामध्ये दुग्धोत्पादक पशुधनावर आधारित शेती पद्धती, शेडनेट हाउस मधुमक्षिका पालन, मूरघास युनिट, काढणी पश्चात व साठवण तंत्रज्ञान, कायमस्वरूपी गांडूळखत युनिट व हिरवळीचे खत या घटकांचा समावेश करण्यात आल्याचे विवेक सोनवणे यांनी सांगितले आहे.

योजेनेंतर्गत दिलेला लाभ : पशुधन आधारित शेतीपद्धतीकरिता 2021-22 मध्ये 342 लाभार्थ्यांना 1 कोटी 31 लाख 95 हजार रुपये, मुरघास युनिटसाठी 7 लाभार्थ्यांना 8 लाख 75 हजार रुपये, शेडनेट हाउससाठी 2 लाभार्थ्यांना 10 लाख 37 हजारांचे अनुदान देण्यात आले. याशिवाय कायमस्वरूपी गांडूळखत युनिटसाठी 22 लाभार्थ्यांना 11 लाख, हिरवळीच्या खतासाठी 105 लाभार्थांना 5 लाख 25 हजार व काढणीपश्चात तंत्रज्ञान बाबीकरिता 22 लाभार्थ्यांना 44 लाख रुपये यानुसार लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती विवेक सोनवणे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण appeared first on पुढारी.