नाशिक : शेतमालापाठोपाठ दूध दरातही घट; लिटरमागे सहा रुपयांची तफावत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात कांदा, द्राक्ष, टोमॅटो, मिरची, वांगी यांसह इतर पिकांचा आणि फळबागांचा समावेश आहे. त्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता दुधानेही शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. गेल्या महिन्यात प्रतिलिटर ३६ रुपये असलेले गायीचे दूध या महिन्यात थेट 30 रुपयांवर आले आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधात 6 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस, वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याच शेतीमालाला भाव नाही. द्राक्ष, कांदे, टमाटे, वांगे, कोबी, फ्लॉवर व इतर पालेभाज्या अक्षरश: मातीमोल विकून स्वत:ला सावरण्यात व्यग्र असताना आता दुधाच्या घटलेल्या दराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र उन्हाळ्यात दुभती जनावरे पाणी जास्त पीत असल्याने त्यांच्या दुधातील फॅट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डेअरीवर मिळणाऱ्या दुधाच्या दरात घसरण होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे आधीच शेतीमालाला भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी दुधाचे दर कमी झाल्याने आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

दूध व्यवसाय आता सोपा राहिलेला नाही. सरकी ढेप, कांडी ढेप, चुनी अशा पशुखाद्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे हा व्यवसायही तोट्यात येत आहे. हिरवा चारा, कडबा कुट्टी ही वैरणसुद्धा परवडत नाही. – सुनील गवळी, शेतकरी ब्राह्मणगाव विंचूर.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतमालापाठोपाठ दूध दरातही घट; लिटरमागे सहा रुपयांची तफावत appeared first on पुढारी.