नाशिक : सप्तश्रृंगगड विकासासाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

श्रीक्षेत्र सप्तशृंगगड विकासासंदर्भातील सुधारित प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या काही दिवसांत प्रस्तावाला मान्यता मिळून निधी वितरित केला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामांना प्रारंभ करताना विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ना. भुसे यांनी दिली आहे.

सप्तशृंगगडाच्या विकासाबाबत पालकमंत्र्यांची आग्रही भूमिका आहे. गडाचा ब वर्ग तीर्थक्षेत्रअंतर्गत मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीचा आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे. उच्चाधिकार समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रकांसह १२ जुलै राेजी ग्रामविकास विभागास सादर केला आहे. यासंदर्भात भुसे यांनी वारंवार बैठका घेत पाठपुरावा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री व ना. महाजन यांना भुसे यांनी पत्र दिले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात श्री सप्तश्रृंगी देवी हे साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असून, मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक तेथे असतात. त्यामुळे सुधारित आराखड्यातील मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. आराखड्यास मंजुरी देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आराखड्यात प्रस्तावित काही कामे इतर योजनांमधून सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे वगळून तसेच भाविकांच्या गरजा व मागणीनुसार काही नवीन कामांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.

आराखडा २०.२५ कोटींचा

सप्तश्रृंगगडावर यात्रेकरिता साधारणत: 25 ते 30 लाख भाविक येत असतात. या क्षेत्राला ब वर्ग दर्जा प्रदान आहे. येथील महत्त्व लक्षात घेता तीर्थक्षेत्र विकास योजनेतून 23 कोटी 2 लाख ५० हजार रुपयांचा आराखडा शासन सादर केला होता. उच्चाधिकार समितीच्या सूचनेनूसार मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा 20 कोटी 25 लाख 78 हजार रुपयांचा करण्यात आला आहे.

The post नाशिक : सप्तश्रृंगगड विकासासाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे appeared first on पुढारी.