नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य देण्याचे काम कष्टकरी कामगार करत आहे, मात्र बदलणार्‍या सरकारी धोरणांमुळे आजकाल कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

आयएसपी व सीएनपी प्रेस मजदूर संघातर्फे शनिवारी (दि. 8) नाशिकरोडच्या प्रेस जिमखाना येथे हिंद मजदूर संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात खा. शरद पवार बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर जुंद्रे होते. व्यासपीठावर नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार हेमंत टकले, हिंद मजदूर संघाचे राष्ट्रीय खजिनदार जयवंतराव भोसले, हिंद मजदूर संघाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी हरभजनसिंग सिंधू, महाराष्ट्र हिंद मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी संजय वडारकर, माजी महापौर अशोक दिवे, प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आदी उपस्थित होते.  खासदार शरद पवार म्हणाले. की, 25 वर्षांपूर्वी मुंबईत कष्टकरी कामगार दिसायचा. आज कष्टकरी कामगार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसतोय. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आजच्या राज्यकर्त्यांना कष्टकरी कामगारांची चिंता वाटत नाही, त्याऐवजी रामाच्या मंदिराची चिंता वाटते, अशी टीका खा. शरद पवार यांनी करून, तुमच्या डोक्यावर असलेल्या लाल रंगाच्या टोप्या कामगार एकजूट, संघर्षाची एकजूट दर्शवते. आज मात्र भगवी टोपी घालून मिरवणारेदेखील दिसतात, अशी कोपरखळी खासदार शरद पवार यांनी भाजपला लगावली. हिंद मजदूर संघ अन् प्रेस कामगारांचे कौतुक करताना खासदार शरद पवार म्हणाले की, तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे, ते तुमच्या एकीत, हिंद मजदूर संघात आहे. आमचा तुम्हाला मनापासून पाठिंबा आहे. अशीच एकी ठेवा, संघटित राहा, असे सांगून अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. हिंद मजदूर संघाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी हरभजनसिंग सिंधू यांनी भाषणात म्हटले की, केंद्राने उद्योजकाच्या दबावाखाली येऊन संघर्ष करून केलेल्या कामगार हितांचे कायदे रद्द करण्यात आले आहे, कामगारांना आठ तासापेक्षा अधिक काम देणे, हवे तेव्हा कामावरून काढून टाकणे, असे कायदे करण्याचा आले आहे, आज देशात कामगारांना कामाची सुरक्षा राहिलेली नाही. कोळसा खाणी, रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन विकासाच्या नावाखाली खासगीकरण केले जात आहे. याकडे लक्ष वेधले. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशात कामगार अन् शेतकर्‍यांच्या विरोधात कायदे आहेत. शेतकरी वर्गाने देशपातळीवर आंदोलन करून ते कायदे मागे घ्यायला लावले, कामगारांनीदेखील अशीच एकजूट दाखवायला हवी. वाढती कंत्राटी पद्धत कामगार अन् युनियनसाठी प्रचंड घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, खा. शरद पवार आदर्श नेते आहेत. त्यांनी 2009 – 2010 मध्ये प्रेस कामगारांना केलेल्या मदतीची आठवण करून देत खा. शरद पवार हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे आवर्जून म्हटले. हिंद मजदूर संघाचे राष्ट्रीय खजिनदार जयवंतराव भोसले म्हणाले की, आजचे केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात विधेयक मंजूर केले आहे. त्यांना जाब विचारणारे नेतृत्व हवे असून कामगार चळवळ भक्कम करणार्‍या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे म्हणाले की, आयएसपी आणि सीएनपी प्रेसमध्ये केवळ हिंद मजदूर संघ ही एकमेव युनियन असून तिचे सर्व श्रेय येथील कामगारांना असल्याचे प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी म्हटले. राजेश टाकेकर यांनी सूत्रसंचालन केले. समारंभाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आभार मानले. डिजिटल करन्सीमुळे बेरोजगारी वाढणार : डिजिटल करन्सी ही मोठी समस्या प्रेस कामगारांपुढे आहे, यामुळे बेरोजगारी वाढेल, बँकांनाही कामे उरणार नाही. हॅकिंग, सायबर गुन्हे वाढतील अशी भीती सभेत कामगार नेत्यांनी बोलून दाखवली.

भुजबळांना तेलगी प्रकरणाची आठवण
गंगाप्रसाद जीएम होते, त्यांनी नोटा छापाई मशीनची सुरक्षा गांभीर्याने केली नाही, परिणामी तेलगी प्रकरण घडले अन् माझा काही संबंध नसताना मला राज्याचा उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र पुढे सीबीआय चौकशी झाली, मी निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले, पण मी केवळ नाशिकचा असल्याने मला राजीनामा द्यावा लागला होता, अशी आठवण भुजबळ यांनी यावेळी बोलून दाखवली.

खा. शरद पवार यांनी नेतृत्व करावे
व्यासपीठावर उपस्थित कामगार नेत्यांनी कामगारांना स्वतःच्या कामाची, नोकरीची हमी आता राहिलेली नाही. ती सुरक्षा आम्हाला देण्यासाठी सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन आम्हाला पाठिंबा द्यावा, यात खा. शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असा सूर भाषणात दिसून आला.

हेही वाचा:

The post नाशिक : सरकारी धोरणांमुळे कामगार उद्ध्वस्त : खासदार शरद पवार appeared first on पुढारी.