नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे

खासदार गोडसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘सांसद आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत किर्तांगळी (ता. सिन्नर) येथील विकासकामांचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी घेतला. गावातील 32 पैकी 22 कामे अद्यापही सुरू झाली नसल्याचे समोर आल्याने गोडसे यांनी यंत्रणांची झाडाझडती घेतली. तसेच ही कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले.

केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेमधून खा. गोडसे यांनी यंदा किर्तांगळी गावाची निवड केली आहे. या गावात खासदार निधीतून विविध प्रकारची 32 कामे प्रस्तावित केली आहेत. याबाबतच गोडसे यांनी शुक्रवारी (दि. 26) संबंधित यंत्रणांची बैठक घेत गावातील कामांचा आढावा घेतला. किर्तांगळी गावात सद्यस्थितीत केवळ सातच कामे पूर्ण झाली असून तीन कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या कामांमध्ये तीन रस्त्यांची कामे आहेत. याशिवाय स्मशानभूमीचे वॉल कंपाउन्ड, पेव्हर ब्लॉक बसविणे व अन्य दोन कामांचा समावेश आहे. किर्तांगळी गावातील प्रस्तावित कामांमध्ये व्यायामशाळा, नऊ ते दहा रस्त्यांची कामे, अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत कार्यालयासह अन्य कामांचा समावेश आहे. परंतु, यातील एकाही कामाच्या शुभारंभाचा नारळ अद्यापही फुटलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या गोडसे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना फैलावर घेतले. या कामांचे प्रस्ताव तयार करून त्याची मान्यता व तांत्रिक बाबींची पूर्तता करून मान्यता घ्यावी. त्यानंतर तातडीने ही कामे हाती घ्यावी, असे आदेशच गोडसे यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

रायपूरचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांसद आदर्श गावासाठी चांदवड तालुक्यातील रायपूरची निवड केली आहे. या गावातील विकासकामांचा आराखडा यंत्रणांनी तयार आहे. परंतु, ना. डॉ. पवार यांची अंतिम मान्यता आराखड्याला मिळाली नसल्याचे समजते आहे. या वर्षीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. अशा वेळी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी हाती असताना गावाचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकून पडला असल्याचे बोलले जात आहे.

The post नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती - खासदार हेमंत गोडसे appeared first on पुढारी.