नाशिक : साक्री पोलिसांनी केली सात लाखांची गावठी दारू जप्त; संशयित फरार

नाशिक

पिंपळनेर,  पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील म्हसदी गाव शिवारातील जंगलात साक्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ७ लाखांची गावठी दारु आणि रसायनसाठा जप्त करण्यात आला आहे. जंगलात गावठी हातभट्टी लावून दारु पाडण्याचे काम सुरु असल्याची गुप्त माहिती साक्रीचे स.पो.नी मोतीराम निकम यांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करत स.पो.नी निकम व त्यांचे पथक गावातून काळगाव रस्त्याच्या दिशेने गेले. तेव्हा सदर इसम दारु पाडत असल्याचे दिसून आले.

पोलिसांचे पथक पाहुन आरोपी  पसार झाला. त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र तेथून तो पळुन जाण्यात यशस्वी झाला. पळून गेलेल्या इसमाचे नाव संजय रामदास माळीच (रा. म्हसदी) असे असल्याचे समजते. त्यानंतर पथकाने हातभट्ट्यांवर दोन पंचासमक्ष झाडाझडती घेतली. या ठिकाणी ७ लाख १० हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु आणि रसायने आणि साहित्य पोलिसांनी जागीच नष्ट केली. संजय माळीच विरुध्द साक्री पोलीस ठाण्यात अभिलेखावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड,अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.मोतीराम निकम, पीएसआय प्रसाद रौंदळ,कॉ.विक्रांत देसले,दीपक विसपुते,शांतीलाल पाटील, तुषार जाधव,अर्जून खलाने या पथकाने केली.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : साक्री पोलिसांनी केली सात लाखांची गावठी दारू जप्त; संशयित फरार appeared first on पुढारी.