नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा

वाळू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सारूळ शिवारात खाणपट्टा क्रमांक कक्ष-१५/२/४७३/२०१८ मध्ये गेल्या वर्षभरापासून अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या मे. गजानन क्रशर यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी बेलगाव कुऱ्हे येथील दत्तू गुळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास २७ जूनपासून मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही गुळवे यांनी यावेळी दिला.

गुळवे यांनी दिलेल्या निवेदनात शासनाचे नियम डावलून गजानन क्रशरकडून उत्खनन केले जात आहे. साडेसात एकर क्षेत्रावर उत्खननास परवानगी असताना ४५ एकर क्षेत्रावर बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. येथील डोंगर पोखरल्याने खोल खड्डे पडले आहेत. परिणामी निसर्गाचे विद्रुपीकरण होत असून, क्रशर चालक कोणालाही जुमानत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने खाणपट्टा रद्द झाला असताना दंडात्मक कारवाई न करता खाणपट्टा बेकायदेशीरपणे सुरू आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चाैकशीचे आदेश दिलेले असतानाही याबद्दल कोणतीच कठाेर कारवाई झालेली दिसून येत नाही. दरम्यान, या प्रकरणी जानेवारीत मुंबई येथे मंत्रालयासमोर आंदोलनावेळी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या क्रशरचालकावर कारवाईचे आदेश मंत्रालय स्तरावरून दिले होते. मात्र, अद्यापही त्यांची कार्यवाही झालेली नाही, याकडे निवेदनाद्वारे त्यांनी लक्ष वेधले आहे. खाणपट्टामाफियांच्या दहशतीमुळे सामान्यांना प्रवेश दिला जात नाही. या भागात शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने गजानन क्रशरचालक राजरोसपणे बेकायदेशीर उत्खनन करत आहे. नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच विद्रुपीकरण सुरू आहे. त्यामुळे संबंधित क्रशरचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा. अन्यथा २७ जूनपासून मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही गुळवे यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा appeared first on पुढारी.