नाशिक : हृदयरुग्णांकरीता कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा फुले योजना कार्यान्वित

Cardiac department www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या अत्याधुनिक कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू झाल्याने आर्थिक दुर्बल घटकांतील हृदयरुग्णांना मोफत उपचाराच्या सुविधा मिळणार आहेत. यानिमित्ताने आरोग्य क्षेत्रात नामको हॉस्पिटलचे कार्य अधिक विस्तारले जाणार असल्याची माहिती नामकोचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांनी दिली.

नामको हॉस्पिटलधील पी. आर. धारिवाल कार्डिअ‍ॅक केअर सेंटरमध्ये जनआरोग्य योजना लागू झाल्याने सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम दर्जाचे हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होणार आहेत. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी यांसह विविध प्रकारच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर व शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांमधील हृदयाचे आजार, बायपास शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या ओपन हार्ट सर्जरीचाही समावेश आहे. नामको हॉस्पिटलमध्ये अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या कार्डिअ‍ॅक कॅथलॅबचा शुभारंभ नुकताच केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व दानदाते प्रकाश धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सुविधेमुळे उत्तर महाराष्ट्रातील गरजू हृदयरोग रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच, सर्व प्रकारच्या ओपन हार्ट सर्जरीची सुविधा उपलब्ध झाली आहे. या विभागामुळे नामको हॉस्पिटल आता कॅन्सरसोबतच हृदयरोगाच्या रुग्णांसाठीदेखील लाइफलाइन ठरणार आहे.

गरिबांना जीवनदान
नामको हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसोबतच मल्टिस्पेशालिटी विभागांतून रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, आता कार्डिअ‍ॅक विभाग कार्यरत झाल्याने हृदयाशी संबंधित सर्व प्रकारचे निदान व उपचार या विभागात करणे शक्य होणार आहे. जीवनदायी योजनांमुळे गरिबांना महागड्या सुविधा मोफत उपलब्ध होणार असल्याचे अनेकांना जीवनदान मिळणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : हृदयरुग्णांकरीता कार्डिअ‍ॅक विभागासाठी महात्मा फुले योजना कार्यान्वित appeared first on पुढारी.