नाशिक : ७५० किलो कचऱ्याचे संकलन, नंदिनी नदीची विशेष स्वच्छता मोहीम

नंदिनी नदी नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, गोदावरी संवर्धन विभाग व सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १८) नंदिनी नदीलगत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे ७५० किलो कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरणरक्षण हेतूने नदीपात्राचे होणारे प्रदूषण आणि अस्वच्छता रोखण्यासाठी नंदिनी नदीलगतच्या रामदासस्वामी मठाजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मनपाचे सफाई कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स यांच्याकडून नंदिनी नदीमधील आणि परिसरातील कचरा, पालापाचोळा, प्लास्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेकरिता मनपाचे ३० सफाई कर्मचारी आणि एनसीसीचे १५० कॅडेट्स उपस्थित होते. या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे आठवड्यातील दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे याठिकाणी वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. त्यामुळे आजच्या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गोळा केलेला कचरा घंटागाडीच्या माध्यमातून खतप्रकल्प येथे पाठविण्यात आला.

या विशेष स्वच्छता मोहिमेकरिता मनपा गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख तथा उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, घनकचरा विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, सात महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल रवि व्यास, सुभेदार सचिन पाटील, ७ महाराष्ट्र बटालियनचे कर्मचारी, मनपा विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ७५० किलो कचऱ्याचे संकलन, नंदिनी नदीची विशेष स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.