निवडणुकीचे वेध : कॅलेंडर, नवीन वर्ष, मकरसंक्रांतीला उडणार प्रचाराचा धुरळा

प्रचार, शुभेच्छा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुका केव्हा होतील हे सांगणे जरी सध्या अवघड असले तरी, इच्छुकांकडून प्रचाराची एकही संधी दवडली जात नसल्याचे चित्र आहे. सध्या इच्छुकांकडून आपल्या प्रभागातील मतदारांना विशेषत: ज्येष्ठांना धार्मिक स्थळांची वारी घडविण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या आखल्या जात आहेत. त्यामध्ये कॅलेंडरसह मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगूळ वाटपातून प्रचाराचा धुरळा उडवून दिला जाणार आहे.

मार्च 2022 मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर केव्हाही महापालिका निवडणुका घोेषित केल्या जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. सुरुवातीला ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील असा अंदाज बांधला जात होता. मात्र, पावसाळा लांबल्याने त्याचा परिणाम निवडणुकांवर होईल असाही कयास लावला गेल्याने दिवाळीनंतरच म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका घोषित केल्या जातील असे बोलले गेले. आता नव्या वर्षात म्हणजेच जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या – दुसर्‍या आठवड्यात निवडणुका घोषित केल्या जातील, अशी नवी चर्चा सुरू आहे. दरम्यान, इच्छुकांनी या चर्चा बाजूला ठेवत, प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे. सध्या मतदारांना विविध धार्मिक स्थळी वारी घडवून आणली जात आहे. सातपूरमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठांना मोफत वारी घडविण्याची योजना आखली आहे. त्याकरिता मतदारांकडून आधारकार्डच्या झेरॉक्स गोळा केल्या जात आहेत. दुसरीकडे नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी इच्छुकांकडून योजना आखल्या जात आहेत. कॅलेंडर करण्याचे कामही जोरदार सुरू आहे. सर्वात अगोदर आपले कॅलेंडर घरोघरी पोहोचवावे याकरिता जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीलाही प्रचाराचा धुरळा उडवून दिला जाणार आहे. तिळगुळाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा इच्छुकांचा मानस असून, त्यादृष्टीने सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

प्रिंटिंग व्यवसाय जोरात
वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तसेच कॅलेंडरही मोठ्या प्रमाणात छापले जाणार असल्याने, सध्या प्रिंटिंग तसेच डीटीपी व्यवसाय जोरात आहे. सर्वप्रथम आपलेच कॅलेंडर मतदारांपर्यंत पोहोचावे, यासाठी सध्या धडपड सुरू असल्याने, आतापासूनच प्रिटिंगची कामे सुरू आहेत. कॅलेंडर वाटपातून महिलांनाही रोजगार मिळत आहे.

हेही वाचा:

The post निवडणुकीचे वेध : कॅलेंडर, नवीन वर्ष, मकरसंक्रांतीला उडणार प्रचाराचा धुरळा appeared first on पुढारी.