नेपाळचा कांदा महाराष्ट्रात आयात होणार नाही : ना. डॉ. भारती पवार

भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बाजारभाव पाडण्यासाठी नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात करण्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहे. नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रात येणार नाही. नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नेपाळच्या कांद्याची विक्री केली जाणार नाही. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर गडगडल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भाव नियंत्रित ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांनी नाफेडसह एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचे आदेश दिले होते. नाफेडकडून खरेदी केलेला हा कांद्याचा स्टॉक इतर राज्यांना देण्यात येणार आहे. ज्या राज्यांना गरज असेल त्या राज्यांना हा कांदा निर्यात केला जाणार आहे. नाफेड महाराष्ट्रात कांदा इथे खरेदी करेल, पण इथे विक्री करणार नाही, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने काढलेल्या एका अधिसूचनेद्वारे राज्यांना नेपाळमधून कांदा आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही आयात बंधनकारक नाही. आवश्यकेनुसार शेजारच्या राज्याकडूनही कांदा घेऊ शकतात. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याचा भाव पाडण्यासाठी आयात परवानगी दिल्याची चुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाव पाडण्यासाठी नाफेडने कांदा स्टॉक केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post नेपाळचा कांदा महाराष्ट्रात आयात होणार नाही : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.