पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज

सिन्नर सरपंच www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज येणार असल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यांना सौभाग्यवतींच्या पदराआडून राजकारणाचा डाव खेळावा लागेल.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षात सभापतिपद अनुसूचित जमातीकरीता राखीव होते. त्यामुळे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या अडीच वर्षांकरीता सुमन बर्डे व त्यानंतर भगवान पथवे यांना प्रत्येकी सव्वा वर्षे सभापतिपद भूषविले. त्या पंचवार्षिकच्या पुढील अडीच वर्षांकरीता सभापतिपद ओबीसी महिलेकरीता आरक्षित झाले. त्यामुळे वाजे गटाने शोभा बर्के, संगीता पावसे, रोहीणी कांगणे यांना संधी दिली. सभापतिपद मिळेल या आशेवर असलेल्या पुरुष सदस्यांची मात्र भलती निराशा झाली होती. शेवटी उपसभापतिपदावरच समाधान मानावे लागले होते. वाजे गटात त्यावेळी जगन पा. भाबड, संग्राम कातकाडे आणि उर्वरित सर्वसाधारण गटातील महिलांना उपसभापतिपदावर संधी देण्यात आली होती. म्हणजेच गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात एकटे भगवान पथवे सोडले तर सभापतिपदावर महिलांचेच राज्य होते. आणि आतादेखील सर्वसाधारण महिलेकरीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे सभापतिपदाकडे डोळे लावून बसलेल्यांची तूर्त तरी घोर निराशा झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

सदस्यपदात रस कमी
पंचायत समितीचा केवळ सदस्य होण्यात कोणालाही फारसा रस नसतो. कारण विकासकामांसाठी मोजकाच निधी मिळत असतो. सदस्य झाले तरी समस्या सुटत नाहीत, असा बहुतांश जणांचा कटू अनुभव आहे. मग, त्यापेक्षा गावचा सरपंच बरा, असेही गमतीने बोलले जाते. त्यामुळे पंचायत समितीचा सदस्य होण्यापेक्षा इच्छुक सभापतिपदाकडे डोळे लावून बसले होते. पहिल्या अडीच वर्षांकरीता तरी त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

आता लक्ष गट, गणांच्या आरक्षणाकडे
इच्छुक उमेदवार पद भूषविण्यासाठी सगळीकडे संधी शोधत असतात. आरंभी सरपंचपदासाठी प्रयत्न करायचे, नाहीच मिळाले तर पंचायत समितीचा… सभापतिपदाचा माहोल तपासून घ्यायचा. तेही नाही जमले तर मिनी मंत्रालयाची अर्थातच जिल्हा परिषदेची पायरी चढण्याचा प्रयत्न करायचा. त्याच पध्दतीने आता इच्छुकांचे लक्ष गट आणि गणांच्या आरक्षणाकडे लागलेले नसले तर नवलच.

हेही वाचा:

The post पंचवार्षिक निवडणुका : सिन्नर पंचायत समितीत पुन्हा महिलाराज appeared first on पुढारी.