पदवीधरच्या मतमोजणीसाठी २८ टेबल; सय्यद पिंप्रीच्या गोदामात प्रशासनाकडून तयारी सुरू

godown www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) विभागात ४९.२८ टक्के मतदान झाले आहे. सय्यद प्रिंपी (ता. नाशिक) येथील निवडणूक शाखेच्या गोदामात गुरुवारी (दि.२) पाचही जिल्ह्यांची एकत्रित मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, २८ टेबलवर मतमाेजणी होईल.

राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विभागातून एक लाख २९ हजार ४५६ पदवीधरांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर आता साऱ्यांचेच लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील गोदामात गुरुवारी (दि.२) सकाळी ८ पासून ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी २८ टेबल मांडण्यात आले आहेत. या प्रत्येक टेबलवर एक तहसीलदारासह दोन नायब तहसीलदार तसेच एक शिपाई नियुक्त करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका एकत्रित करून त्याचे एक-एक हजारांचे गठ‌्ठे करण्यात येतील. त्यानंतर १६ उमेदवार आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येतील. दरम्यान, अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर उरलेल्या वैध मतपत्रिकांची मोजणी करून त्याद्वारे विजयासाठीचा आवश्यक कोटा निश्चित केला जाईल. मतमोजणीत जो उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमवारीत आवश्यक कोटा पूर्ण करले, त्याला विजयी घोषित करण्यात येणार आहे.

कोटा ठरविण्याचे सूत्र
पदवीधर निवडणुकीत विजयाचा कोटा ठरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक सूत्र घालून दिले आहे. त्यानुसार अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर राहिलेलेल्या वैध मतपत्रिकांतून हा कोटा निश्चित केला जाणार आहे.

सूत्र : वैध मतपत्रिका + १ भागिले 2 = येणारी संख्या ही विजयी काेटा असेल.

* मतपत्रिकांसाठी १६ उमेदवारांसह अवैध मतपत्रिका असे १७ बॉक्सेस
* कोटा निश्चितीसाठी दुपार होणार
* निवडणूक शाखेच्या गोदामात पहिल्यांदाच मतमोजणी

हेही वाचा:

The post पदवीधरच्या मतमोजणीसाठी २८ टेबल; सय्यद पिंप्रीच्या गोदामात प्रशासनाकडून तयारी सुरू appeared first on पुढारी.