पवार साहेब, कुठे कुठे जाऊन माफी मागणार? : छगन भुजबळांचा प्रतिसवाल

छगन भुजबळ, शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येवल्यामध्ये शनिवारी (दि. 8) झालेल्या सभेत छगन भुजबळांना घेरताना चुकीचा माणूस दिला म्हणून येवल्याच्या जनतेची माफी मागतो, या शरद पवार यांच्या राजकीय टीकेला कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना सर्व आरोप चुकीचे ठरवत, साहेब, कुठे कुठे जाऊन माफी मागणार? येवल्यापासून गोंदियापर्यंत माफीच मागणार का? असा प्रतिसवाल केला.

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ शनिवारी प्रथमच जिल्ह्यात आले. शहरात त्यांचे जंगी स्वागत केले गेले. त्यानंतर रविवारी (दि. 9) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी येवल्यातील सभेत उपस्थित झालेल्या विविध मुद्द्यांबाबत आपली मते मांडली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, समाधान जेजूरकर आदी उपस्थित होते.

येवल्यात ज्यांनी सभेचे आयोजन केले, अशा माणिकराव शिंदे यांच्यावर पक्षाने २०२० मध्येच चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांचे पक्ष व येवल्यासाठी काही योगदान नाही. येवल्यात दुसरे कोणी भेटले नाही म्हणून त्यांचे सहकार्य घ्यावे लागले. आमदार दराडे नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेत असतात. त्यांचीदेखील मदत घेतली गेली आहे. सभेला एवढे दिग्गज व्यासपीठावर होते. मग राष्ट्रवादीचा उमेदवार नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांत पराभूत होतोच कसा? असा सवाल यानिमित्ताने भुजबळ यांनी विचारला.

भुजबळ यांना आपण येवल्यात पाठवले, हा पवार यांचा दावा भुजबळ यांनी यावेळी खोडून काढला. आपण मला येवल्यात पाठवले नव्हते, तर येवल्याच्या जनतेने मला २००४ मध्ये बोलावून घेतले होते. त्यामुळे मी तेथून लढलो. सलग दोन वेळा विधानसभेवर जाणाऱ्या उमेदवाराला पराभूत करत मी सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आलो. आपण म्हणालात तसे, मी जर चुकीचा असतो, तर पुन्हा पुन्हा आमदार झालोच नसतो, असा पलटवारही त्यांनी केला.

आंबेगाव येथील सभा रद्द करून येवल्यात घेतली याचा मला आनंद आहे. त्यांनी येवला निवडले पण माझ्यावर राग का आहे? फूट, बंडखोरी मी घडवून आणली, असे साहेबांना वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. आपल्याच घरापासून याची सुरुवात झाली आहे. दिल्लीत अनेक वर्षे आपल्यासोबत असलेले प्रफुल्ल पटेल बंड का करतात? केंद्रात मोदी, गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी पटेलांना पाठवायचे. एवढा त्यांच्यावर विश्वास होता, तरीदेखील मी हे सर्व घडवून आणले आहे, असे वाटत असेल, तर हे चुकीचे आहे, असा दावा भुजब‌ळ यांनी केला.

साहेबांनी २००४ मध्ये मला निवडणुकीला उभे राहावे, असे सांगितले होते. त्यापूर्वी दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर माझगावमधून निवडून आलो होतो. तसेच राष्ट्रवादीमध्ये आल्यावर नेता झालो असे नाही. यापूर्वी मी नगरसेवक, महापौर, आमदार होतोच, असे सांगताना भुजबळांनी प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत असल्याचे सांगितले. २००३ मध्ये तेलगी घोटाळा झाला. त्या तेलगीला मीच पकडले, मोक्का लावला. नेहमीप्रमाणे आपणच केल्याचे बालंट माझ्यावर आले आणि मला राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार मी राजीनामा दिला. केस सीबीआयकडे गेली. चौकशी झाल्यावर त्यात भुजबळ नाव नव्हते. मला नाहक राजीनामा द्यायला लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

येवला येथील सभेत मांजरपाडा प्रकल्पाबाबत सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले. मात्र हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. प्रवाही पद्धतीने समुद्रात जाणारे पाणी आपण वळवले असून, आता पाणी जिल्ह्यात पोहोचले आहे. थोडेफार अस्तरीकरणाचे काम अपूर्ण राहिले आहे. तेही वेळेत पूर्ण होत असतानाच कळमुस्ते योजना परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मंजूर करून आणली आहे. तसेच २००९ पासून मी समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याला प्रवाही पद्धतीने वळण देणाऱ्या प्रकल्पांबाबत काम करत आहे. त्यामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा भुजबळ यांनी केला.

पुण्यातदेखील असे कार्यालय नाही

सभेसाठी जाताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी भवनाबाहेर ताफा थांबविला. याबाबत बोलताना भुजबळ यांनी, असे कार्यालय पुण्यातदेखील उभारले नसल्याचे बोलत असतील, असे मिश्कीलपणे सांगितले.

शिंदे, फडणवीसांनी लगेच ऐकले

मंत्रालयात जिजाबाई, छत्रपती, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांप्रमाणेच महात्मा फुलेंची प्रतिमा लावा, असे सांगत होतो. परंतु तसे झाले नाही. फडणवीस व शिंदे यांना सांगितले आणि महिनाभरात काम झाले. भिडे वाड्यासाठी अनेक मीटिंग झाल्या. ओबीसींचे काम होतेय मग मला काय अडचण? मागासवर्गीयांचे प्रश्न केंद्र व राज्य सरकार मिळून सोडवू शकेल म्हणून सोबत जात आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post पवार साहेब, कुठे कुठे जाऊन माफी मागणार? : छगन भुजबळांचा प्रतिसवाल appeared first on पुढारी.