पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

मृतदेह www.pudhari.news

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बोडकीखडी येथे सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे भानुदास गांगुर्डे व ग्रामस्थांनी केली आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

मूळ झारखंडमधील रहिवासी असलेला कृष्णा साव हा तरुण १० ते १२ वर्षांपासून साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे जेसीबी व्यवसायानिमित्त वास्तव्यास होता. कृष्णा साव या इसमाच्या कानाला सर्पदंश झाल्याने त्यास दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नसल्याने बराच वेळ प्रतीक्षेनंतरही उपचार झाले नाही. कर्मचारी गैरहजर राहिल्याने कृष्णा साव यास तातडीने साक्री येथे नेण्यात आले. तेथूनही प्रकृती गंभीर असल्याने कृष्णा यांना धुळे येथे नेण्यास सांगितले. मात्र, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर खासगी वाहनाने धुळे येथे नेत असताना नेर गावादरम्यान कृष्णा साव यास मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी झारखंडकडे रवाना करण्यात आला आहे. कृष्णा साव याच्यावरील उपचारासाठी विलंब झाल्याने दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होऊन त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, चंद्रकांत ईशी, कल्पेश चौधरी, धनंजय गांगुर्डे, संदीप ठाकरे, उमेश गांगुर्डे, शशिकांत गांगुर्डे, भाऊराव बहिरम, मुकुंदा बागूल, सुनील गांगुर्डे, हंसराज बच्छाव, सुनील चौधरी, सुनील सावळे, महेंद्र सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.