पिंपळनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्याने ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न केले पूर्ण

कर्णवीर राजेंद्र भामरे

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील मालपूर गावातील भूमिपूत्राने गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करत डॉक्टर हाेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कर्णवीर राजेंद्र भामरे हा गावातील तरुण आता डॉक्टर बनला आहे. त्याने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण केल्याने मालपूर गावाच्या नावलौकीकात मानाचा तुरा खाेवला आहे. त्याच्या यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साक्री तालुक्यातील पुरोगामी गाव म्हणून मालपूरची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशात ओळख आहे. समाजकारण व राजकारण तसेच शिक्षण क्षेत्रातही गावाचा लौकिक आहे. गावातील मुख्याध्यापक स्व. दामोदर दत्तू भामरे यांचे कुटुंब शिक्षण क्षेत्रात साऱ्यांनाच परिचित आहेत. त्यांचे पुत्र राजेंद्र दामोदर भामरे हे नवापूर येथील वनीता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी वत्कृत्वशैलीच्या जोरावर धुळे जिल्ह्यातच नव्हेतर उत्तर महाराष्ट्रात मालपूरचा नावलौकीक केला आहे. त्यांच्या अर्धांगिणी रजनी राजेंद्र भामरे या साक्री येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. भामरे परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटविला असतानाच  कुटूंबाच्या भावी पिढीतील कर्णवीर राजेंद्रने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून तो रुग्णसेवेसाठी सज्ज झाला आहे.

प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत
डॉ. कर्णवीरचे शिक्षण मालपूर येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत झाले आहे. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनाशी त्याने बाळगली होती. आई-वडीलांची भक्कम साथही त्याच्या पाठीशी होती. माध्यमिक शिक्षण नाशिक येथे घेतल्यानंतर औरंगाबाद येथे क्लास लावून नीटची तयारी केली. त्यानंतर नगर येथे व्हीव्हीपीएफ फाऊंडेशन मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कठोर परीश्रम व सुयोग्य नियोजनाच्या बळावर त्याने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. सामान्य परिवारातील विद्यार्थी डॉक्टर झाला. ही बाब मालपूर गावासाठी अभिमास्पद आहे. या यशाबद्दल डॉ. कर्णवीरवर मालपूरसह साक्री तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मालपूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अध्यापन करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. शिक्षणासाठी इतर कोणत्याच गोष्टीची अडचण न दाखवता आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत, नियमितपणे अध्यापन करत राहिल्यास यश नक्कीच मिळते. माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी मला आई-वडिलांची भक्कम साथ होती. त्यामुळे आज मी हे यश प्राप्त करु शकलो. – डॉ. कर्णवीर राजेंद्र भामरे, मालपूर, ता. साक्री.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्याने 'डॉक्टर' होण्याचे स्वप्न केले पूर्ण appeared first on पुढारी.