पिंपळनेर : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

पिंपळनेर बिबट्या www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील बळसाणे येथे रविवारी (दि.19) रात्री घडली.  सोमवारी (दि.20) दिवसभर प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, बळसाणे परिसरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

बळसाणे येथील रवींद्र डोंगरसिंग गिरासे यांची गाव विहिरीला लागून असलेल्या खाऱ्या नाल्याजवळ खासगी विहीर आहे. पहाटे चार वाजता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडल्याचे आढळले. ही माहिती त्यांनी सरपंच प्रा. ज्ञानेश्वर हालोरे, उपसरपंच मोतीलाल खांडेकर, पोलिस पाटील आनंदा हालोरे व परिसरातील ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन निजामपूर पोलिस स्टेशनला धाव घेतली. त्यानंतर उपनिरीक्षक दीपक वारे यांनी वन विभागाच्या कार्यालयात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. ५० फूट खोल असलेल्या विहिरीत पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्याने लोखंडी पाइपला घट्ट पकडून ठेवले होते.

ग्रामस्थांनी तत्परता दाखवून विहिरीत लोखंडी पलंग सोडला व पाइपला लटकलेल्या बिबट्याला बसण्यासाठी जागा करून दिली. त्यानंतर साक्री वन परिक्षेत्र विभागाने वनपाल वनपाल राजेंद्र जगताप, वनपरिक्षेत्र पडला होता. अधिकारी के. एन. सोनवणे, एच. व्ही. ठाकरे, वनमजूर पुंजाराम धनुरे, दीपक सोनवणे, दौलत खैरनार, विक्रम चव्हाण, वामन महिरे यांचा समावेश असलेले पथक दाखल झाले. त्यानंतर पाहणी करून पिंजरा मागवण्यात आला. यावेळी पिंजरा येण्यासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. वारंवार प्रयत्न करूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने बिबट्याला बाहेर कसे काढावे असा प्रश्न पथकाला पडला. अखेर तीन तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात बसला व उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वनविभागाच्या पथकाला नाना धनुरे, चतुर हालोर, पंकज धनगर, नरेंद्र गिरासे, शामराव सोनवणे यांनी याकामी सहकार्य केले.

पिंजऱ्यासाठी आठ तासांची प्रतीक्षा
बळसाणे येथे भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने पाच वर्षांचा बिबट्या विहिरीत पडला होता. वन विभाग, पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. परंतु वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल आठ तासांनंतर पिंजरा आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत appeared first on पुढारी.