पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

पिंपळनेर दिंडी www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा डांगशिरवाडे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ तसेच दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.

पिंपळनेर दिंडी सोहळा www.pudhari.news

वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने मुख्याध्यापक श्रीकांत दिलीप अहिरे, शिक्षक गोविंद ग्यानदेव बागुल, राजू रुधा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या आदल्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने दिंडीस प्रारंभ करण्यात आला. दिंडीत सहभागी होतांना ‘राम कृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ अशा नामघोषात शाळकरी विद्यार्थी व गावकरी रमून गेले. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची टाळ गजरात मिरवणूक काढण्यात आली.

पिंपळनेर दिंडी सोहळा www.pudhari.news

विठ्ठलाची वेशभूषा इयत्ता पहिलीतील शान भाऊसाहेब माळी याने तर रुक्मिणीची वेशभूषा इयत्ता दुसरीतील मालू सुधाकर सोनवणे या विद्यार्थ्यांनी साकारली. दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळशी घेणाऱ्या शाळकरी मुली, झेंडेकरी, विणेकरी यामुळे सर्व गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. गावातील प्रत्येक चौकात लहान मोठ्यांनी बाल वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत फुगड्या खेळून दिंडीचा आनंद लुटला.

पिंपळनेर दिंडी सोहळा www.pudhari.news

दिंडी पुन्हा शाळेत आल्यानंतर सरपंच मनिषा सोनवणे, ग्रामसेवक वर्षा जगताप, उपसरपंच शरद चव्हाण, पोलिस पाटील मनोज देवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सपना सोनवणे यांच्या हस्ते शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक.२ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिलीच्या प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना स्टॉलवर नेऊन हसत-खेळत उपक्रमातील कृती प्रशिक्षण देण्यात आले. कृती कार्यक्रमास पालकांचा उत्तम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले appeared first on पुढारी.