भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर

अॅड. प्रकाश आंबेडकर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

भांडवलशाही, उच्चवर्णीय व सत्ताधारी हे एकमेकांच्या हातात हात घालून सत्ताकारण करत आहेत म्हणून कामगार, कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे अन्याय होऊन त्यांचे हक्क डावलले जात आहेत, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तपोवन आयोजित राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या पहिल्या राज्यव्यापी द्वैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संघराज रूपवते, अरुण भालेराव, कार्याध्यक्ष राजाभाऊ बोढारे, अशोक सोनवणे, सुनील बनसुडे, जालिंदर पांढरे, डॉ. विवेक मवाडे, सुरेश गुरचळ, प्रकाश वागरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वीज कंपनीतील संघटनांनी कामगार हिताबरोबरच सामाजिक हित जोपासण्याची गरज आहे. त्यांनी कामगारांबरोबर शेतकरी आदी विविध क्षेत्रांतील कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. भांडवलशाही आणि जातिभेद हे समाज व्यवस्थेच्या विरोधात आहे, हे आपल्याला मांडता आले पाहिजे. कोणत्याही धर्मात सामाजिक व्यवस्था समाविष्ट केलेली असते. त्यात तत्त्वे असतात आणि त्यातून आर्थिक भूमिका बाहेर पडते. त्यामुळे समाज व्यवस्था टिकविणे गरजेचे आहे. माझी संस्कृती काय आहे? हेच विसरल्याने कशाला न्याय द्यायचा आणि कशाला नाही, हे उमजत नाही. आपण भांडवलशाहीविरोधात उभे आहे. हे म्हणणे आपल्याला सांगता आले पाहिजे. आंबेडकरांनी जातिअंताची चळवळ आदेशित केलेली असताना आज जातीय आरक्षणासाठी निघणारे मोर्चे हे एकसंघ भारताच्या दृष्टीने फलदायी नाही, असेही परखड मत त्यांनी मांडले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे यांनी फुले, शाहू व आंबेडकर यांचे विचार आगामी कालावधीत तेवत ठेवता येईल, याचा विचार करावा. तसेच संघटना अधिक मजबूत करा, असे आवाहन केले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संविधान आणि बहुजन समाज यावर संघराज रूपवते यांनी, तर वीज कंपन्यांचे खासगीकरण व संघटनेची भूमिका यावर अरुण भालेराव, अशोक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

अधिवेशनातील मंजूर ठराव

-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या नफ्यातील कंपन्यांचे खासगीकरण करू नये.

-मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तत्काळ सुरू करावे.

-मागासवर्गीय सरळसेवा भरती अनुशेष भरावा.

-कंत्राटी पद्धत व बाह्य स्रोत पद्धत बंद करावी

-कर्मचारी संख्या वाढवावी, कंत्राटीकरण बंद करावे

-जनमित्र व कक्ष अभियंता यांचे कामाचे तास निश्चित करावे

-जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांना अभियंता पदावर सामावून घ्यावे

-खासगी उद्योगांकडुन महागड्या दराने वीज खरेदी बंद करावी.

हेही वाचा :

The post भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.