भाजप व्यापारी संवाद संमेलन : देशात नऊ वर्षात सर्वांगिण विकास; ना. महाजन यांचा दावा

भाजप व्यापारी संमेलन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ वर्षात देशाचा सर्वांगीण विकास झाल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. कॉग्रेस नेते राहुल गांधी या ठिकाणी असते तर देश एवढा पुढे गेला असता का? असा प्रश्न उपस्थित करत दहा वर्षे तुमचे पंतप्रधान होेते. पण तुमचे सरकार बहिरे व मुके होते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. आमच्या सरकारने विकास केला म्हणून छातीठोकपणे तो आम्हाला सांगण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

भाजपाने मोदी@9 महाजनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअतंर्गत रविवारी (दि. १८) आयोजित व्यापारी संमेलनाला ना. महाजन यांनी संबोधित केले. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, ज्येष्ठ नेते विजय साने, व्यापारी आघाडीचे शशिकांत शेट्टी आदी उपस्थित होते. ना. गिरीश महाजन म्हणाले, देशात आज हवशे-नवश्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. खा. संजय राऊत हे तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी करताहेत. मात्र, देशात पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. नऊ वर्षात देशाने सर्वांगीण विकास केला असून कृषी, आरोग्य, मेक इन इंडिया यासारख्या क्षेत्रात शासनाने भरीव कामगिरी केली. परंतु राहुल गांधी हे परदेशात जाऊन देशाची इभ्रत घालवत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. याप्रसंगी उपस्थित व्यापाऱ्यांनी एलबीटी, एपीएमसी ॲक्ट, मनपा जागे भाडेवाढ यासह अन्य मुद्यांवर प्रश्न मांडले. व्यापारी वर्गाच्या समस्या निराकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. यावेळी आ. फरांदे व लक्ष्मण सावजींनी मार्गदर्शन केले. शशिकांत शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल संचेती यांनी आभार मांडले.

वैद्यकीय महाविद्यालयाला ४०० कोटी
नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाला ४०० कोटींचा निधी मंजूर केला असून लवकरच निविदा प्रक्रीया राबविली जाईल, असे महाजन यांनी सांगितले. तसेच राज्यात नऊ वर्षात १० मेडिकल महाविद्यालय उभे राहिले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभे राहणार असून लवकरच दहा महाविद्यालयांना मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post भाजप व्यापारी संवाद संमेलन : देशात नऊ वर्षात सर्वांगिण विकास; ना. महाजन यांचा दावा appeared first on पुढारी.