भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थी निमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना

महागणपती www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात श्री सिद्धी महागणपती भव्य असे देवस्थान उभारण्यात येत असून श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने हे भव्यदिव्य असे गणपती मंदिर साकारण्यात येत आहे. आज गुरुवार, दि. 9 संकष्टी चतुर्थी निमित्त या ठिकाणी १०० टन वजनाची ३१ फूट उंच असलेली भारतातील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची  प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. १६ दिवस हा धार्मिक सोहळा चालणार असून ९ यज्ञ कुंडाव्दारे २ लाख ५१ हजार आहुती दिल्या जाणार आहेत.

या महागणपतीच्या मूर्तीमध्ये गणपती रिद्धीसिद्धी सहित स्थानापन्न झालेले आहेत. त्यांच्या उजव्या सोंडत अमृतकुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा आहे. ३७४ टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणातून ३१ फूट उंच १०० टन वजनाची मूर्ती घडविण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी हा दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला आहे. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला १५ फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी असलेले हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात.

महागणपती www.pudhari.news

जळगाव : महागणपतीच्या मूर्तीसह रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्या आहेत. (छाया: चेतन चौधरी)

पाच हजार वर्ष मुर्तीचे आयुष्यमान
ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवून आधी मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर मंदिर साकारण्यात आले. मंदिराचा ग्रेनाईट सभागृह २० हजार स्क्वेअर फुटाचा आहे. ५० बाय ५० फूट गर्भगृहाचे निर्माण करण्यात आले. १२५ फूट उंचीवर ९ फूटाचा मंदिराचा कळस आहे. २०० किलोची महाघंटा, १०० फूट रुंद २१ पायर्‍या, ५ हजार वर्षांपेक्षा जास्त मूर्तीचे आयुष्य असून ६ फुटाचा बैठकी मूषकराज देखील बाप्पाच्या पायापाशी विसावलेले आहेत.

मूर्तीखाली २१ कोटी मंत्र लिहिलेली पुस्तके
जिल्ह्यातील चार ते पाच हजार भाविकांनी लिहिलेली ‘ओम गण गणपतेय नम:’ अशी मंत्र असलेली तब्बल २१ कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहेत. एका पुस्तकात ५४ हजार मंत्र लिहिण्यात आली आहेत. अशा पद्धतीने २१ कोटी मंत्र लिहायला अडीच वर्ष लागली. मूर्तीच्या खाली २१ फूट खोल पाच थरामध्ये पॅकिंग करुन पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर त्यावर मूर्ती ठेवून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

विद्वानांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने या सिद्धी महागणपतीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील १८ विद्वानांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते नान्दीश्राद्ध, गणपती मातृका पूजन, दशविध स्नान हवन, नित्य आराधना, जलयात्रा, दुग्धअभिषेक करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post भारतातील सर्वात मोठ्या बाप्पांची संकष्टी चतुर्थी निमित्त जळगावात प्राणप्रतिष्ठापना appeared first on पुढारी.