महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ कार्यकारणी मध्ये धुळ्याचा सन्मान, सचिवपदी ॲड. संजीव वाणी, कार्यकारिणीत मंजुळ शाह

धुळे पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंडळाच्या सचिवपदी धुळे येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.संजीव वाणी यांची निवड करण्यात आली. कार्यकारणीत धुळ्याच्या मंजुळ शाह यांचा समावेश आहे.

सभेत २०२४ – २०२८ या चार वर्षासाठी महामंडळाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष हेमराज शहा (मुंबई), अध्यक्षपदी जयप्रकाश पारेख (नागपूर) तर पुण्याचे राजेश शहा यांची महामंत्रीपदी निवड झाली. उपाध्यक्ष पदी मुकेश मेहता (सोलापूर), सेक्रेटरी ॲड. संजीव वाणी (धुळे) आणि खजिनदार लखमशीभाई शहा (मुंबई) या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये २५ कार्यकारिणी सदस्य असून ५ को. ऑप. कार्यकारिणी सदस्य व १० निमंत्रित सदस्य अशा एकूण ४० सदस्यांचा समावेश आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू यांच्या देखरेखीत पार पडली.

ॲड. संजीव वाणी हे गुजराती समाज, धुळेचे अध्यक्ष असून मंजुळ शाह हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सभेमध्ये महामंडळाचे संस्थापक हेमराज शहा यांची नुकतीच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच निताबेन शेठ (महाड), शैला मयूर (जळगाव) आणि सुरेखा वाणी (धुळे) यांच्या नेतृत्वात महिला समिती गठीत केली. सभेला मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नाशिक, श्रीरामपूर, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नांदेड, अहमदनगर, अमरावती, अकोला, चोपडा इत्यादी प्रमुख शहरांतील गुजराती समाजातील संस्था, संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुजराती समाजहिताच्या दृष्टीने पुढील काळात महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम, समाजाचे एकीकरण, शैक्षणिक समस्या इत्यादींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच गुजराती समाज परिचय संमेलने घेणे, लहान व गृहोपयोगी व्यवसायांवर चर्चा करणे अशा बऱ्याच विषयांवर चर्चा करून योजनाबद्ध कार्यक्रम आखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त महामंत्री राजेश शहा यांनी दिली आहे.

The post महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ कार्यकारणी मध्ये धुळ्याचा सन्मान, सचिवपदी ॲड. संजीव वाणी, कार्यकारिणीत मंजुळ शाह appeared first on पुढारी.