महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मुंबई अध्यक्षपदी अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार भारती पॅनलने अजय ब्रम्हेचा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या पॅनलला धूळ चारत विजयश्री खेचून आणली. फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष दि. लासलगांव मर्चट बॅक अजय ब्रम्हेच्या तर उपाध्यक्षपदी सहकार भारतीच्या वैशाली आवाडे विजयी झाल्या.

अध्यक्षपदी सहकार भारती पॅनलचे अजय ब्रम्हेच्या यांना 11 मते तर विरोधी पॅनलचे उमेदवार निपुण कोरे यांना 10 मते पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले निपुण कोरे हे आमदार विनय कोरे यांचे भाऊ आहेत, हे येथे उल्लेखनीय. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहकार भारतीच्या वैशाली आवाडे यांना 11 मते तर विरोधी पॅनलचे योगेश बन यांना 10 मते मिळाली.

या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत सहकार भारतीने कुठल्याही राजकीय दबावापुढे न झुकता सक्षम कार्यकर्त्यांच्या भरवशावर ही विजयश्री खेचून आणली आहे. सहकार भारतीचा हा विजय संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून राजकारण मुक्त सहकार ही संकल्पना प्रत्यक्ष रूपाने साकार करणारी ठरणार असल्याचे अजय ब्रम्हेचा यांनी सांगितले.

सहकार भारतीने फेडरेशनचे विजयी संचालक शशिताई अहिरे, सत्यनारायण लोहिया, शंतनु जोशी, सुनील देवडा, चंद्रहास गुजराथी, रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे, अशोक शेळके यांचे आभार मानले. सहकार भारतीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिजर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, नाशिक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकुर, नानासाहेब सूर्यवंशी, संजय वडनेरे, अशोककाका व्यवहारे, अमृता पवार, दत्तानाना गायकवाड़ यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्ष वैशाली आवाडे व या निवडणुकीत मतदान करून सहकार भारतीवर विश्वास दाखवणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मुंबई अध्यक्षपदी अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे appeared first on पुढारी.