मालेगावचे पुढचे आमदार कोण? संजय राऊतांनी सांगितलं…

संजय राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

मालेगावात उद्या उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार असून त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत मालेगावमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मालेगावची जनता उत्सुक आहे. मालेगावातून उद्या संपूर्ण महाराष्ट्राला संदेश जाणार आहे. जनतेची चीड उद्या मालेगावमधील सभेतून दिसेल. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव येताय, त्यांचेही स्वागत आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला लाखोंची गर्दी होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मालेगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले, मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मालेगाव मध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत, ते पळून गेले ते सोडून द्या असा टोला त्यांनी दादा भुसे यांना नाव न घेता लगावला. पण मालेगावचे पुढचे आमदार हे अद्वय हिरे असतील असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना शिवसेनेचं नेतृत्व स्विकारावं असं वाटतय. देशातील मुस्लिम बांधवांना उद्धव ठाकरे माझे नेते आहेत असे वाटत असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ज्या प्रकारच्या घटना देशात घडताय ते पाहाता देशात लोकशाही राहिलेली नाही. विरोधी पक्ष संपून टाकायचा, जे सत्य बोलतील, आपल्या विरोधात बोलतील त्यांना न्यायालय व इतर तपास यत्रंणाच्या माध्यमातून नष्ट करायचं अशा प्रकारचे दळबद्री राजकारण या देशात व राज्यात सुरु असल्याचे राऊत म्हणाले. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा मग खरी शिवसेना कोणती ते कळेल असे आव्हान त्यांनी विरोधकांना केले.

राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या निशाण्यावर कायम उद्धव ठाकरेच राहिले आहेत. इतके उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मोठे आहे. एकनाथ शिंदेंनी स्वत:चा पक्ष काढावा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. राज ठाकरे यांच्या पक्षाला 18 वर्ष होऊन गेले, त्यांनी त्यांच्या पक्षावर बोलावं, तुम्ही तुमचा पक्ष किती वाढवला किती आमदार व किती खासदार निवडून आणले असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

The post मालेगावचे पुढचे आमदार कोण? संजय राऊतांनी सांगितलं... appeared first on पुढारी.