नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

साखर कारखाना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाऊस व हवामान बदलामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये ऊस गाळपात, साखर उत्पादनात आणि साखर उतार्‍यात मोठी घट झाली आहे. यंदा राज्यात 1,053 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या उच्चांकी 1,370 लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात तब्बल 11 लाख 2 हजार 167 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

जिल्ह्यातील दोन्ही प्रकारांतील साखर कारखान्यांनी 9.71 टक्के उतारा मिळविला आहे. ऊस गाळप दैनंदिन क्षमतेत वाढ, ऊस उत्पादन घटल्याने आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी अर्धा टक्का साखर उतार्‍यात घट झाल्याने साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदा राज्यातील सर्व विभागांचा सरासरी साखर उतारा 9.98 टक्के म्हणजेच 10 टक्क्यांपेक्षा कमी राहिल्याने साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षाच्या साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून सन 2022-23 या चालू वर्षाच्या राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सोमवारी संपला. राज्यात या हंगामात 106 सहकारी, तर 104 खासगी असे 210 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले. दि. 16 एप्रिलपर्यंत राज्यातील 209 कारखाने बंद झाले होते. साखर उतार्‍याच्या (10.42 टक्के) तुलनेत यंदा सुमारे अर्धा टक्के घट झाली आहे. त्याचा फटका साखर उत्पादनाला बसला आहे. इथेनॉलला दर चांगला मिळत असल्याने अनेक कारखानदारांनी त्याचे उत्पादन करण्याला पसंती दिली आहे. नाशिक जिल्ह्यात या हंगामात 11 लाख 35 हजार 562 मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. रानवड साखर कारखान्याची गाळप क्षमता 1,250 मे. टन आहे. 5 डिसेंबर 2022 ते 11 फेब्रुवारी 2023 या काळात कारखान्याने 1 लाख 12 हजार 503 मे. टन उसाचे गाळप केले. 1 लाख 4 हजार 560 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने सरासरी 9.29 टक्के उतारा मिळवला. कादवा कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात 2 नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीत 3 लाख 3 हजार 175 मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी 11.50 टक्के साखर उतारा मिळविला आहे. त्यात 3,48,600 क्विंटल साखरेची निर्मिती झाली. पळसे साखर कारखान्याने 21 नोव्हेंबर 2022 ते 15 फेब्रुवारी 23 या काळात 56 हजार 800 मे. टन उसाचे गाळप करताना 46 हजार 50 क्विंटल साखर उत्पादन केले. 8.11 टक्के उतारा राहिला. विठेवाडीच्या वसंतदादा साखर कारखान्याने 1 लाख 19 हजार 378 मे. टन उसाचे गाळप केले. 1,95,100 क्विंटल साखरेची निर्मिती केली. 7.97 टक्के उतारा मिळवला. सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश कारखान्याने 4 नोव्हेंबर 22 ते 6 एपिल 23 या काळात 5,43,705 मे.टन उसाचे गाळप करीत 5 लाख 7 हजार 857 उत्पादन घेतले. 9.34 टक्के साखर उतारा राहिला.

हेही वाचा:

The post नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट appeared first on पुढारी.