माळे दुमाला आदिवासी संस्थेत कोट्यवधीचा अपहार

दिंडोरी(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील माळे दुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्यादित संस्थेकडून कर्ज घेतलेल्या सभासदांची रक्कम घेऊन त्याची कोणतीही नोंद न करता कर्जदारांना निल (निरंक) दाखला देत दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांचा अपहार संगनमताने करून फसवणूक केल्याची फिर्याद शासकीय प्रमाणित लेखा परीक्षकांनी दिल्याने वणी पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

माळे दुमाला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्यादित संस्थेकडून संस्थेतील सभासदांनी दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज विविध सभासदांनी संस्थेत जमा केले. त्यापोटी त्यांना निल (निरंक) म्हणजेच कोणतेही कर्ज बाकी नाही, असा दाखला देण्यात आला. संस्थेची थकबाकी वसुली प्रणाली सुरू असताना कर्जदारांकडे चौकशी केली असता, त्यांनी निल दाखला असल्याची माहिती दिली. संबंधितांनी याची खातरजमा केली. या रकमेची नोंद कर्जखतावणी, रजिस्टर, वसुली रजिस्टर, रोखकिर्द यामध्ये आढळली नाही. तसेच संस्थेच्या वसुली रजिस्टर व रोखकिर्द व्यवहार नोंदविले नाहीत. त्यामुळे दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेच्या या रकमेचा अपहार संगनमताने केल्याची फिर्याद शासकीय प्रमाणित लेखा परीक्षक विष्णू त्र्यंबक वारुंगसे यांनी दिल्याने दत्तात्रय परशराम कोरडे (रा. टेकाडीपाडा वणी, ता. दिंडोरी), बाजीराव नारायण भदाणे (रा. बेलबारे, ता. कळवण), किशोर अशोक गांगुर्डे (रा. वणी) अशा तिघांविरोधात वणी पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार कोठावळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान 1/4/2007 ते 31/3/2023 या कालावधीत या रकमेचा अपहार झाला असून, 16 वर्षांनी हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सखोल चौकशीची मागणी सभासदांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post माळे दुमाला आदिवासी संस्थेत कोट्यवधीचा अपहार appeared first on पुढारी.