मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्राद्वारे भविष्य सिद्ध करा अन् एकवीस लाख जिंका!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ईशान्येश्वर मंदिरात कुंडली पाहिली जात नाही किंवा हातही पाहिले जात नसल्याचा दावा अंनिसने मान्य केला आहे. परंतु, संबंधित व्यक्ती अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याने त्यांनी अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिद्ध करावे अन‌् २१ लाख रुपये बक्षीस जिंकावे, असे आव्हानच अंनिसने दिले आहे.

अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. तसेच मंदिर व्यवस्थापनाने ज्योतिष पाहत असल्याचा दावा खोडून काढलेला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसेल तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा आणि तसे हमीपत्र लिहून द्यावे. अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रुद्रपूजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. परंतु, संबंधित व्यक्तीची ख्याती पाहता ही पूजा भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा, असा संशय अंनिसने व्यक्त करत पूजा आमावस्येला केली गेली. इतकेच नव्हे, तर ही पूजा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या नावाखाली दौरा आयोजित केला की काय, अशी शंका अंनिसने उपस्थित केली आहे. मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून व गोपनीयता राखत प्रोटोकॉल तोडून हा दौरा झाला असून, मुख्यमंत्र्यांना रुद्र पूजा करायची तर मुंबईला अथवा ते कुठेही करू शकत होते. मात्र, ईशान्येश्वर मंदिरात पूजा केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहून हा तोडगा केला गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ज्योतिष शास्त्र नव्हे, थोतांड

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा संबंधित लोकांशी मैत्री होण्याचे गुपित उघड करावे. शिक्षणमंत्र्यांची कृती ही विद्यार्थ्यांना चुकीचा संदेश देणारी आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी पूजेला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे असल्याच्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंनिस सर्वांच्या श्रद्धा व उपासनेचा आदर करत असल्याचे स्पष्ट करत कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या ज्योतिषाला विरोध असल्याचे अंनिसने ठामपणे सांगितले आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून, थोतांड आहे. ते स्वप्न विकण्याची कला आहे. जनतेने अशा लोकांपासून दूर राहावे व अंधानुकरण करू नये, असे आवाहन चांदगुडे यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्राद्वारे भविष्य सिद्ध करा अन् एकवीस लाख जिंका! appeared first on पुढारी.