मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात नाशिकची ‘इस्पॅलिअर’ प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-   जानेवारी महिन्यापासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा राज्यस्तरीय निकाल लागला असून, यामध्ये नाशिकच्या इस्पॅलिअर हेरिटेज शाळेने खासगी संवर्गात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या दिंडोरी येथील जऊळके प्राथमिक शाळेला विभागातील प्रथम क्रमांक आणि अ आणि ब वर्ग महापालिकेच्या शाळांच्या संवर्गात नाशिक महापालिका क्षेत्रात येणाऱ्या महापालिका शाळा क्रमांक ४९ पंचक या शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. येत्या मंगळवारी (दि.५) या शाळांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे.

खासगी शाळांच्‍या गटातून बारामतीचे शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेने दुसरा, तर छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवे पाटील शाळेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच शासकीय संवर्गातून वाशिममधील साखरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रथम क्रमांक, रायगड येथील हेडवाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्वितीय, तर सांगली जिल्ह्यातील डहाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

राज्यात “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान सुरू करण्यात आले होते. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर अशा तीन स्तरांवर हे अभियान करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील सुमारे १ लाख शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे वि‌द्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम अशा कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता. या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले होते. मंगळवारी (दि.५) होणाऱ्या पारितोषिक वितरणामध्ये अभियानात राज्यस्तरावर, विभागस्तरावर, मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रामधील विजेत्या ६६ शाळांचा समावेश आहे.

– एकूण सहभागी शाळा : १ लाख ३ हजार ३१२ शाळा

– राज्यस्तरावर निवडलेल्या शाळा : ३ शासकीय शाळा, ३ खासगी शाळा

– विभागस्तरावर निवडलेल्या शाळा : ८ विभागांतून ६ अशा ४८ शाळा

– मुंबई महापालिका : ३ शासकीय शाळा, ३ खासगी शाळा

– अ व ब वर्ग महापालिका : ३ शासकीय शाळा, ३ खासगी शाळा

इस्पॅलिअर स्कूलने पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. पुरस्काराच्या माध्यमातून बक्षिसाच्या रकमेचा विनियोग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाकरिता फिरती शाळा बनवण्यासाठी करणार आहोत. तसेच महिरावणी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना शैक्षणिक साहित्यसुद्धा उपलब्ध करून देणार आहे. – सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक, इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल

हेही वाचा :

The post मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात नाशिकची 'इस्पॅलिअर' प्रथम appeared first on पुढारी.