राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार

नाशिक : वैभव कातकाडे
गाव-शिवारातील शेती, सेंद्रिय, गुरांचा तसेच गोशाळेतील कचर्‍यावर प्रक्रिया करून गॅस बनविण्याचा यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीने केला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊन गावात घरोघरी तसेच तो व्यावसायिकांना वापरासाठी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातून तयार होणारी स्लरी ही शेतीसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून उपयोगात येणार आहे. त्यामुळे कचर्‍यापासून गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार आहे. राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.

स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गोबरधन योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीमध्ये सदर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एका गावामध्ये गोबरधन प्रकल्प राबविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.  जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील अंदरसूल गावाची निवड करण्यात आली. राज्यस्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक संस्थेकडून गावाचे सर्वेक्षण, आराखडा, अंदाजपत्रक इत्यादी काम पूर्ण करण्यात आले. यानंतर या कामाचे ई-टेंडर करण्यात आले. राज्यातील पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प आहे. अंदरसूल प्रकल्पाला युनिसेफ संघटनेचे सल्लागार जयंत देशपांडे यांनी भेट देत कौतुक केले होते. त्यासोबतच दिल्ली येथील स्वच्छ भारत मिशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील पाहणी करत हा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे नमूद केले होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जैव-कचर्‍याचे रूपांतर करून गावांमध्ये स्वच्छता करण्यासाठी गोबरधन योजना राबविण्यात येत आहे.

गोबरधन हा राज्यातील नावीन्यपूर्ण प्रकल्प स्वच्छ भारत मिशनच्या सहाय्याने साकारला जात आहे. यामधून तयार होणारा गॅस हा व्यावसायिक, घरगुती वापराला देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर स्वच्छता राहणार आहे. परिणामी, आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होईल. – आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

असा आहे प्रकल्प ….
खर्च : 50 लाख
गॅसचा फायदा : 50 घरांना प्रायोगिक तत्त्वावर तसेच हॉटेल व्यावसायिकांना फायदा
किती गॅस तयार होणार : 1080 किलो प्रतिमहिना

बायो-मिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर
* बायो-मिथेनेशन तंत्रज्ञान या नवीन प्लांटला ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2016’अंतर्गत मान्यताप्राप्त झालेली आहे.
* या तंत्रज्ञानपासून निव्वळ ऊर्जा उत्पादन होते.
* प्लग अँड प्ले प्लांट प्रोप्रायटरी मायक्रो ऑर्गनिझमवर चालते.
* सर्वांत इकोफ्रेंडली सोल्युशन, हानिकारक ग्रीन हॉऊस गॅसेस टॅप करते.
* खूप कमी जागा आणि त्याच्या पूर्णपणे प्री-फॅब्रिकेटेड प्लांटची आवश्यकता आहे.
* कोणतीही दुर्गंधी आणि वास नाही कारण वनस्पती पूर्णपणे वॉटर जॅकेट आणि कॉम्पॅक्ट आहे.
* गरजेनुसार आकार सहज वाढवता किंवा कमी करता येतो. गरज पडल्यास सहज हलवता येते.

हेही वाचा:

The post राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार appeared first on पुढारी.