राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार

Ajit Pawar

जळगाव : राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर, पालघरमध्ये जे झाले त्यात सगळी यंत्रणा अडकली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावावरून निव्वळ राजकारण सुरू आहे. यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अजित पवारांनी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, शासन आपल्या दारी या योजनेवर प्रंचंड खर्च होत आहे. मात्र विरोधी असल्याने आम्हाला निधी दिला जात नाही, आमची काम मंजूर केली जात नाही, असेही अजित पवार म्हणाले.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालास देखील भाव नाही. या सर्व बाबीमुळे सर्वसामान्य जनतेत सरकारप्रति रोष व्यक्त केला जात आहे. यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललं आहे. हे सरकार 20 लोकांचे आहे. तीन-तीन, चार-चार खाते एक एकाला दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यांना पाहिजे तितका न्याय दिला जात नाही, असे पवार म्हणाले.

राज्यात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू

राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. अनेक मंत्र्यांवर छापे मारले जात आहे. बदल्यांचे रेट सुरू आहे. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही. सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट नियमात असो नसो मंजुरी दिली जात आहे. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे, असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : 

The post राज्यात जातीय दंगलींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात : अजित पवार appeared first on पुढारी.