‘राष्ट्रवादी’चा मोर्चा : ..तर जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालणार

राष्ट्रवादी मोर्चा www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित केशरी शिधापत्रिकाधारकांना येत्या 25 तारखेपर्यंत दिलासा न मिळाल्यास 26 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा मालेगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. सोमवारी (दि. 12) माजी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांच्या उपस्थितीत येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

अशोका लॉजपासून मोर्चा निघून, मोसम पूल, कॅम्प रस्त्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याठिकाणी माजी महापौर शेख रशीद, ताहेरा शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांची भाषणे झाली. ग्रामीण व शहरी भागाकरिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांचा जिल्हानिहाय इष्टांक निश्चित आहे, त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकांची संख्या 1 लाख 78 हजार 563 इतकी, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या 29 लाख 80 हजार 804 इतकी निश्चित झाली आहे. शिवाय, अंत्योदय योजनेचे 4098 कार्ड शिल्लक असून, प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या 1 लाख 43 हजार 96 इतकी शिल्लक आहे. संपूर्ण जिल्ह्यात केशरी कार्डधारकांना धान्य वितरण होत असताना मालेगावातील दारिद्य्र रेषेखाली कुटुंबांवर का अन्याय होतो आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शहरातील 1 लाख 20 हजार केसरी कार्डधारकांना अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट करून त्यांना योजनेचा त्वरित लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना साखर देणे अनिवार्य आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. शहरातील एकूण शिधापत्रिका धारकांपैकी 28 हजार शिधापत्रिकांवर गॅस नाही, अशी नोंद आहे. त्यांना त्वरित रॉकेल वाटप सुरु करावे. शहर धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या चुकीमुळे प्राधान्य कुटुंब योजनेचे रद्द झालेले 5 ते 7 हजार प्रस्ताव मंजूर करावेत, जीर्ण शिधापत्रिका बदलून मिळाव्यात, या मागण्या येत्या 25 डिसेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास 26 तारखेला सकाळी 12 वाजता पीडित कार्डधारकांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा माजी महापौर शेख यांनी दिला.

हेही वाचा:

The post ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा : ..तर जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालणार appeared first on पुढारी.