राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड

रोहिणी खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून ही घोषणा करण्यात आली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

२०१९ मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारली होती, त्यावेळी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासोबत रोहिणी खडसे यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

रोहिणी खडसे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून, त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला आणि युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा :

The post राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड appeared first on पुढारी.