राष्ट्रीय टपाल सप्ताह : उत्पादन, सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत

टपाल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह ग्रामीण भागात जाळे पसरलेल्या भारतीय टपाल विभागाने कात टाकली आहे. या विभागामार्फत अनेक उत्पादने आणि सेवा पुरविल्या जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय टपाल सप्ताहात या उत्पादनांची तसेच सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली जाईल. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.

राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहायक अधीक्षक (मुख्यालय) प्रशांत मालकर, विपणन कार्यकारी अधिकारी विठ्ठल पोटे, लघुटंकलेखक अमितेश कुमार आदी उपस्थित होते. यंदाच्या आर्थिक वर्षापासून नवीन खाते उघडण्यावर पोस्टाने भर दिला आहे. त्यामुळेच 1 एप्रिल 2022 ते 8 ऑक्टोबर 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात तब्बल 64 हजार 860 खाती नव्याने उघडण्यात आली आहेत. त्यात एकट्या ऑगस्ट महिन्यात ‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त उघडण्यात आलेल्या 10 हजार 500 खात्यांचा समावेश असल्याचे प्रवर डाक अधीक्षक अहिरराव यांनी सांगितले.

16 हजार पॉलिसीधारक
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बजाज अलियांज कंपनीचा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी काढण्यात येत आहे. या विम्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेल्या दीड महिन्यात सुमारे 16 हजार ग्राहकांनी ही पॉलिसी काढली आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहातही ग्राहकांना विमा उतरविण्यासाठी प्रवृत्त केले जाणार असल्याचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी सांगितले.

आज दि.11 ऑक्टोबरला प्रश्नमंजुषा कार्यशाळा

राष्ट्रीय टपाल सप्ताहात 10 ऑक्टोबरला साकूर, नांदूर शिंगोटे तसेच सिन्नर बसस्थानकात पोस्टाकडून विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 11 ऑक्टोबरला मुख्यालयात ग्राहकांसाठी प्रश्नमंजुषा तसेच मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यात पोस्टाच्या दुर्मीळ स्टॅम्पसह विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. 12 ऑक्टोबरला उपनगर येथील कार्यालयात ग्राहकांच्या बैठकीसह उत्कृष्ट पोस्टमनचा सन्मान होणार आहे. 13 ऑक्टोबरला ननाशी व अंलगुण येथे आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार असून, त्यात पोस्टाच्या योजनांचा प्रचार-प्रसार केला जाणार असल्याचे प्रवर डाक अधीक्षक अहिरराव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय टपाल सप्ताह : उत्पादन, सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत appeared first on पुढारी.