रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार 

NCP leader Ajit Pawar news

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाबाबत वाटाघाटी करून निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे न ठेवता पाडापाडी आणि जिरवाजिरवीचे राजकारण न करता आघाडीने दिलेला उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांची भारतीय जनता पार्टी मधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी झाली. या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ ,प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, दोंडाईच्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष जुई देशमुख, डॉक्टर रवींद्र देशमुख यांच्यासह म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या राज्यातील सरकारवर टीकेची तोफ डागली. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. सध्या राज्याचे राजकारण वेगळ्या मार्गाने जाते आहे. राज्यात कुणीही समाधानी नाही. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव महाराष्ट्रात मिळत नाही. पण हैदराबादला कांद्याला पाचपट भाव आहे. अशा अडचणीच्या वेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय काम करत आहे. हे सरकार नाफेडला कांद्याची खरेदी करण्यास का सांगत नाही. कांदा हा खाणाऱ्यांना देखील परवडला पाहिजे. पण पिकवणाऱ्याच्या घरी दोन पैसे मिळाले, तर त्याच्या परिवाराची तो उपजीविका करू शकेल. याचा विचार सरकार करीत नाही. एका शेतकऱ्याने तर त्याला दोन रुपये कांद्याची पट्टी मिळाल्याचे सांगितले. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा, यासाठी कापूस घरात ठेवला. आता कापसाला भाव नाही. सध्या राज्यात अवकाळी पडतो आहे. विजेमुळे मनुष्यहानी आणि जनावरांची देखील हानी होते. त्यांना अजूनही मदत मिळत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.

गद्दारी करून सरकार आले

राज्यातले हे सरकार गद्दारी करून आलेले आहे. यापूर्वी राज्याला 50 खोके ही घोषणा माहीत होती का? ही गोष्ट कोणी माहीत करून दिली. महाराष्ट्राला ही माहिती गद्दारांनी करून दिली आहे. असा टोला त्यांनी लावला. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोनाच्या काळात चांगले काम केले. पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरत ते गोवा मार्गे मुंबईत आले. तुम्ही राज्याचे नेतृत्व करत आहात त्यावेळी असे काय घडले होते. काय चुकले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सर्वांबरोबर चर्चा सुरू होती. पण महाराष्ट्राच्या 75 वर्षाच्या काळात समाज सुधारकांच्या या राज्यात अशा पद्धतीने गद्दारी करून पहिल्यांदा सरकारला आले. या सरकारच्या काळात लोकांची कामे होत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. कोणतेही सरकार येते आणि जाते. आम्ही देखील सत्तेत असताना ताम्रपट घेऊन आलो नव्हतो. पण सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कामांचा पाठपुरावा करून त्यांना दिलासा दिला पाहिजे. पण या सरकारने महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर झालेल्या कामांनाच मोगरी लावण्याचे काम केले. तसेच मंजूर केलेला निधी देखील अडवला. राज्यात यापूर्वी अशा पद्धतीने पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेली कामे आणि निधी अडवण्याची कामे कधीही झाली नाही. तुम्ही तोंड पाहून कामे मंजूर करतात. सरकारची ही दादागिरी आपण खपवून घेणार नाही, असा टोला देखील त्यांनी लावला.

कांद्याचे अनुदान कागदावरच

येत्या 20 जून रोजी या सरकारला आता एक वर्ष पूर्ण होईल  तरीही ते कापूस उत्पादक आणि कांदा उत्पादकांकडे पाहायला तयार नाही  या सरकारने दहा तास वीज देण्याची घोषणा केली. पण ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. खते आणि बियाणांच्या किमती वाढत आहेत. बळीराजा अडचणीत येतो आहे. तुम्ही सरकार कुणासाठी चालवता आहात. मुख्यमंत्री शिंदे यांनी कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली  पण ते अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही. पंचनामा होऊन देखील नुकसानीचे पैसे मिळत नाही. अशा वेळेस शासन कोणाच्या दारी आहे, असा प्रश्न त्यांनी लगावला.

24 टक्के पाठींबा नव्हे 74 टक्के विरोध

लाखो रुपये खर्च करून सरकारच्या जाहिराती दिल्या. या जाहिराती दुसऱ्या दिवशी बदलले जातात.  मुख्यमंत्री शिंदे यांनाच 26 टक्के पाठिंबा असल्याचे दाखवतात. पण 74 टक्के लोकांचा विरोध असल्याचे यातून दिसते. ही विरोध करणारी जनता समोर बसले आहे. त्यामुळे तुम्ही कोणाचे नेतृत्व करता आहात कसले राजकारण करतात . अशी टीका देखील त्यांनी केली.

पाच मंञी वादग्रस्त

राज्यातील शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांवर देखील त्यांनी तोफ डागली. मंत्री अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री आहेत. मात्र त्यांनी शेतकऱ्यांची भले करण्याऐवजी वादग्रस्त काम करणे सुरू ठेवले आहे. विदर्भात कृषी केंद्रांवर बनावट धाडी टाकल्या जात आहेत. तर मंत्री महिला संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात  मंत्री भुमरे यांच्या संदर्भात मद्य विक्रीची दुकाने त्यांच्या  समर्थकांचे असल्याचा आरोप होतो आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील हे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांच्याच मतदारसंघात पाणीटंचाई दूर करू शकले नाही. मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील अनेक आरोप आहेत. तर मंत्री तानाजी सावंत देखील वादग्रस्त वक्तव्य करण्यात पुढे आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.

या राज्यात वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला जातो. मी देखील पुण्याचा पालकमंत्री असताना दिंडीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करत होतो. मात्र तुम्ही थेट लाठी हल्ला करतात. अशा सरकारला त्यांची जागा दाखवावी लागेल. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे तिघेही घटक पक्ष एकत्र निवडणुका लढणार आहेत. त्यामुळे विधानसभा किंवा लोकसभेच्या जागा वाटपात सविस्तर चर्चा होऊन त्या जागांचे वाटप केले जाईल. आम्ही संबंधित जागा आपल्याकडे राखण्यासाठी आमची भूमिका पार पाडू. पण कार्यकर्त्यांनी देखील पाडापाडीचे राजकारण दूर ठेवून महाविकास आघाडीच्या जागा विजयी करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. अशा वेळेस कोणत्याही पक्षाला जागा गेली तरीही कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे न ठेवता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम केले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाडापाडीचे राजकारण आता सहन केले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.

महाराष्ट्र ही पुण्यभूमी असून या राज्याचा आदर्श नेहमी देशभरात राहिला आहे.  देशाच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिल्याचा इतिहास आहे. पण या महाराष्ट्रात सध्या तेढ निर्माण करण्याचे राजकारण सुरू केले आहे  महाराष्ट्रात अनेक सामाजिक चळवळीचा  जन्म झाला. आणि या चळवळी दिशादर्शक झाल्या  दुर्दैवाने या सरकारने पवित्र भूमीवर समाज विघातक प्रयोग सुरू केले आहे . राज्यात गेल्या चार महिन्यात आठ शहरांमध्ये दंगली झाल्या .लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येपासून दूर केले जाते आहे. त्यासाठीच जातीतील तेढ वाढवण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

गणवेश नको शिक्षण द्या : भुजबळ

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य आणि केंद्रातील सरकार हे घोषणा करून घुमजाव करतात, असा आरोप केला. या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी शालेय गणवेश एकच असण्याचे भाष्य केले. पण त्यानंतर सलग दोन वेळेस त्यांनी आपलीच वाक्य फिरवले. सरकार एका विद्यार्थ्याला एक गणवेश देणार, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून या विद्यार्थ्याने सलग सहा दिवस एकच गणवेश घालायचा का, अशी टीका देखील त्यांनी केली. राज्यातल्या विद्यार्थ्यांना गणवेश नको दर्जेदार शिक्षण द्या असा टोला त्यांनी लगावला.

सध्या सरकार इतिहासाचे मोडतोड करण्याचे काम करीत आहे. या विरोधात लढावेच लागेल असे त्यांनी सांगितले. तर भारतीय जनता पार्टीच्या काळातील पर्यटन मंत्री रावळ यांच्यावर बोटीच्या कारणावरून टीका केली. देशात मोदी आणि राज्यात शिंदे असे जाहिरातीत सांगितले. पण यात फडणवीस कुठे गेले. या जाहिरातीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापला नाही. फोटो देखील गुल केला. त्यानंतर पुन्हा जाहिरात दिली गेली. यात शिंदे गटाच्या मंत्र्यांचे फोटो आले. पण भारतीय जनता पार्टीच्या मंत्री कुठे गेले. असा टोला देखील भुजबळ यांनी लावला.

औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्यांना बळी पडू नका, असे आवाहन करताना भुजबळ यांनी सांगितले की ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत तेरा मुस्लिम सरदार होते. ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्टेटसवर औरंगजेबाचे फोटो ठेवणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे दोन्हीही दंगली घडवणारे आहेत. त्यामुळे जनतेने अशा प्रवृत्तींना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : 

The post रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार  appeared first on पुढारी.