लासलगावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर

लासलगाव नेत्यांना गावबंदी,www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या मुख्य रस्त्यावरील त्रिफुलीवर येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली जाणार आहे, असे बॅनर लावण्यात आले आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल १७ दिवस उपोषण केले होते. या आरक्षणाला पाठिंबा म्हणून लाखोने मराठा समाज अंतरवाली सराटी येथे जमा झाला होता. अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून येथील मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी निर्णायक आंदोलन जाहीर केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण पसरत चालले आहे.

भाजपचे रवींद्र होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, काँग्रेसचे सचिन होळकर, माजी उपसरपंच अफजल शेख, बाजार समिती संचालक प्रवीण कदम, संदीप होळकर, मयूर बोरा, विशाल पालवे, सूरज मालपाणी, मनसेचे धर्मेश जाधव, शिवसेनेचे प्रमोद पाटील, मीरान पठाण, अर्शद शेख, वसीम मुलानी, जावेद तांबोळी आदी उपस्थित होते.

येवला तालुक्यातही नेत्यांना प्रवेशबंदी

येवला : मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला असून, त्याला मराठा समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे. जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार, खासदार व मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते, कार्यकर्ते अडचणीत आले असून, येवला तालुक्यातील गावागावांत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पुढारी, नेते, कार्यकर्त्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत. तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेत पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे, तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षणविरोधी पुढाऱ्यांना गावात प्रवेश करण्यास तसेच राजकीय नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला सभा घेण्यास बंदी घातली आहे. अनकुटे ग्रामपंचायतीनेही असाच निर्णय घेतला असून सकल मराठा समाजाकडून सायगाव, गोरखनगर, बदापूर, नागडे, कातरणी, विसापूर यांसह अनेक गावांमध्ये आरक्षणविरोधी पुढाऱ्यांना गावबंदीचे मेसेज सोशल मीडियात फिरत आहेत. तालुक्यातील काही गावांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्याचे लोन आता तालुकाभर पसरू लागले आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश गावांत सध्या राजकीय कार्यक्रम बंद आहेत.

हेही वाचा :

The post लासलगावात नेत्यांना गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.