‘वर्षा अखेर’ला दारू दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

दारु चोरीला,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्टीचे नियोजन केले होते, तर चोरट्यांनीही ‘वर्षा अखेर’च्या पूर्वसंध्येला शहरातील दारू दुकानात व घोटी येथील बारमध्ये घरफोडी करून मद्यसाठ्यासह रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा व घोटी पोलिसांत घरफोडीचे गुन्हे दाखल झाले असून, दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी पाच लाख ८४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

‘थर्टी फर्स्ट’मुळे मद्यपींकडून मागणी जादा असल्याने दारू विक्रेत्यांनी मद्यसाठा करून ठेवला होता. त्यामुळे मद्यपींना दारूसाठी जास्त शोधाशोध करावी लागली नाही. मात्र या संधीचा फायदा चोरट्यांनीही घेतल्याचे दिसले. शहरातील शरणपूररोड परिसरातील वाइन शॉपमध्ये शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री चोरट्यांनी ग्रिल तोडून दुकानात शिरले. विदेशी महागडा मद्यसाठा व शॉपच्या तिजोरीतले ४८ हजार 500 रुपयांची रोकड असा ८७ हजार ६१० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी वाइन शॉपचे व्यवस्थापक शैलेंद्र कडवे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी विशिष्ट एका ब्रँडचीच दारू चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले. वाइन शॉपच्या सीसीटीव्ही तपासणीतून पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घोटीत बारमध्ये घरफोडी

घोटीतील बारमध्ये चोरट्याने डल्ला मारला. मुंढेगाव येथील बिअर बारमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री स्लायडिंग ग्रिलचे कुलूप तोडून घरफोडी केली. यात काउंटरमधील एक लाख ७० हजार रुपये चोरले. तसेच बारमधील विविध ब्रँण्ड्सच्या तीन लाख २६ हजार ९६० रुपयांच्या दारूवरही डल्ला मारला. या प्रकरणी बारच्या व्यवस्थापकाने घोटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

The post 'वर्षा अखेर'ला दारू दुकानांवर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.