‘वसाका’ कारखान्यातील कामगारांना थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी मिळावा : कुबेर जाधव

देवळा; पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांवर पगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी तातडीने जमा करावा, अशी मागणी साखर कारखान्याच्या मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे. सन २०१२ साली सुस्थितीत सुरू असलेल्या साखर कारखान्याच्या कामगारांचा ११ महिने पगार थकला. कामगारांनी पगाराची मागणी केली असता तत्कालीन संचालक मंडळाने तडकाफडकी राजीनामा दिला व कारखान्याचा कारभार करण्यास असमर्थता दाखवत बाजुला गेले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर सर्वाधिक नुकसान कामगारांचे झाले. ११ महीने घाम गाळून रात्रीची पहाट करून सुद्धा कामगारांना श्रमाचा मोबदला न देता त्यांच्यावर ठपका ठेवून पळ काढला. मधल्या काळात तीन- चार वर्षे कारखाना बंदच होता, असेही या पत्रकात म्हटले आहे.

तसेच २०१५/१६ मध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मर्जीतील पाच जणांना सोबत घेऊन प्राधिकृत मंडळ स्थापन केले. व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कारखाना कमी खर्चात सुरू केला. यावेळी शेतकऱ्यांनी व कामगारांनी मोठं योगदान दिले.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडणी करून गव्हानित आणुन टाकला होता, परंतु त्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला लगेच मिळाला नाही. त्यासाठी साखर आयुक्त यांच्या मार्फत धाराशिव उद्योग समुहाला गळ घालण्यात आली. व कामगारांचे पाच महिन्यांचे त्या काळातील पगार धाराशिव उद्योग समूहाने अदा केले.

२०१७/१८ मध्ये महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने थकित कर्ज वसुली पोटी धाराशिव उद्योग समूहाने परस्पर करार करून उस उत्पादक शेतकरी व कामगारांना वाऱ्यावर सोडले. मात्र कामगारांनी एकी दाखवत कामगार संघटनेची करार करून मगच कारखाना सुरू करावा असा आग्रह धरत विषय लावून धरला. उपाशी कामगारांची रोजी रोटी सुरू होईल. या उद्देशाने कामगार संघटना व बहुसंख्य कामगारांनी ठरलेल्या चर्चेप्रमाणे कराराला अधीन राहुन कारखाना सुरू केला, परंतु प्रत्यक्षात करार करण्यास टाळाटाळ व वेळेवर पगार करण्यास विलंब होत गेला. त्यामुळे परत एकदा कामगारांनी संप केला.

धाराशिव उद्योग समूहाने थकित पगार न केल्याने कामगार व व्यवस्थापन यांच्यांत सतत बेबनाव निर्माण होत राहिला, करारा प्रमाणे थकित देणी व कामगारांचे दरमहा पगार करण्यास धाराशिव उद्योग समूहाला अपयश येत गेले. तसेच अपेक्षित गाळप होत नसल्याने त्यांना पाहिजे तसा आर्थिक लाभ मिळत नसल्याने ते कारखाना सुरू करण्यासंदर्भात फारसे उत्सुक नाहीत. कारखाना जर बंद राहिला तर सर्वाधिक नुकसान हे कामगारांचे होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू राहावा. व कामगारांची रोजी- रोटी सुरू राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही मत कारखान्याचे माजी स्थापत्य अभियंता तथा वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केले.

हेही वाचा : 

 

The post ‘वसाका’ कारखान्यातील कामगारांना थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी मिळावा : कुबेर जाधव appeared first on पुढारी.