वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तीन आठवड्यांपासून नाशिक महानगरपालिकेतील आयुक्तपद रिक्त असल्याने प्रशासकीय कामांचा वेग थंडावल्याचे बोलले जाते. त्याचा फटका शहर वाहतूक शाखेसही बसला आहे. मनपा आयुक्तांअभावी शहरातील वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाची ठिकाणे आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पोलिसांनाही बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात अडचणी येत असून, त्याचा फटका वाहतुकीस बसत आहे. ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील वाहतूक खोळंबत असून, वाहतूक शाखाही हतबल दिसत आहे.

शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतीची परिस्थिती होते. वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारल्यास चालकांकडून अपुरे वाहनतळ, माहिती-दिशादर्शक फलकांचा अभाव, झेब्रा क्रॉसिंग दिसत नसल्याच्या तक्रारी होत असतात. त्यामुळे वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी वाहतूक शाखेने मनपाशी संवाद साधून उपाययोजना राबवण्यास सांगितल्या. मात्र, मनपा आयुक्त नसल्याने या उपाययोजना अंमलात येत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने महापालिकेशी शहरातील वाहनतळांच्या यादीसह झेब्रा पट्टे, सिग्नल यंत्रणेतील बदलासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. मात्र, महापालिका आयुक्त नसल्याने ठोस निर्णय हाेत नसल्याने प्रश्न जैसे थे असून, वाहतुकीतील अडथळे सुटत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकारी, नागरिकांसह पोलिसांचेही लक्ष मनपा आयुक्तांच्या नियुक्तीकडे लागल्याचे बोलले जात आहे.

वाहतूक पोलिसांमार्फत कोंडी फोडण्याचा प्रयत्न

गंगापूररोड, कॉलेजरोड परिसरात शनिवारी व रविवारी प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे या मार्गांवरील चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेतील अंमलदारांची नेमणूक केली आहे. वाहतूक पोलिसांमार्फत वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर आहे.

वाहतूक पोलिसांना मनपा, स्मार्ट सिटीकडून अपेक्षित कामे

वाहतूक पोलिसांनी मनपा प्रशासनास अपेक्षीत कामांची यादी दिली असून त्यावर अंमलबजावणी होण्याची वाट पोलिस बघत आहे. त्यानुसार रस्त्यांवर झेब्रा पट्टे व पार्किंगची ठिकाणे आखणे, व्यावसायिक आस्थापनांच्या पार्किंग आखणे, रस्त्यांवरील व रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे काढणे, वाहनतळांसहित नो पार्किंगचे फलक लावणे अपेक्षीत आहे. तर स्मार्ट सिटीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त चालकांवरील ई-चलान कारवाई सुरु करणे, प्रस्तावित २३ सिग्नल्सची उभारणी करणे यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा:

The post वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक appeared first on पुढारी.