विल्होळीतील प्लास्टिक मोल्डिंगच्या तीन कंपन्यांना भीषण आग

कंपनीला आग,www.pudhari.news

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा ; विल्होळी येथील प्लॅस्टिक मोल्डिंगच्या तीन कंपन्यांना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तीनही कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र या आगीत करोडो रुपयांचे मशीनरी व कच्चा माल जळून खाक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विल्होळी येथील प्रशांत व डॉ. संदीप मानकर यांच्या मालकीच्या ब्रॉस प्लास्टिक या कंपनीला रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ हवेत पसरले. आग पसरून बाजूला असणाऱ्या दोन कंपन्यांनाही आग लागली. या ठिकाणी आग लागल्याचे समजताच जागृत नागरिकांनी सिडको फायर स्टेशनला कॉल केला. सिडको केंद्राचे फायरमन मुकुंद सोनवणे, श्रीराम देशमुख, कांतीलाल पवार, भिमा खोडे, वाहन चालक इस्माईल काझी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तिन बंब घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी एकत्रित आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत ब्राँस प्लास्टिक या कंपनीचे अंदाजे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर, डागा प्लास्टिकचे एक कोटी रुपयांचे व प्रमोद फायबर या कंपनीचे अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवार सुट्टी असल्याने कपंनीचे कामकाज बंद होते. या आगीचे कारण मात्र समजू शकले नसून पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा :

The post विल्होळीतील प्लास्टिक मोल्डिंगच्या तीन कंपन्यांना भीषण आग appeared first on पुढारी.